मराठी माणसाला न्याय मिळायला हवा असा दावा करून स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी सूर सापडलाच नाही. शिवसेना आणि सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्ष झेंड्यातून हिरवा रंग कधी गायब झाला आणि त्यांचे इंजिन रुळावरून कधी घसरले याचा पत्ता ना राज ठाकरे यांना लागला आणि ना त्यांच्या कार्यकर्त्यांना, अशी जळजळीत टीका शिवसेना प्रवक्त्या आणि विधान परिषद सदस्या प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी केली.
रेल्वेची परीक्षा देण्यासाठी कल्याण स्थानकावर आलेल्या उत्तर भारतीय युवकांना मनसेच्या मराठी कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मराठी कार्यकर्त्यांवर आजही न्यायालयात खटले सुरू आहेत. राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाने या मराठी कार्यकर्त्यांना जामीन देण्यासाठीही कधी पुढाकार घेतला नव्हता, पूर्ण दुर्लक्ष केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
याच कारणामुळे हे कार्यकर्ते मनसे सोडून गेले, याची आठवण करून देतांना पुढे त्या म्हणाल्या की, आता राज ठाकरे यांच्या आवाहनामुळे नव्याने मराठी तरूण भोंगा विरुद्ध आरती या आंदोलनात सहभागी होत आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याच मराठी तरुणांवर कारवाई होईल आणि मनसे किंवा राज ठाकरे जामीन द्यायलाही पुढे येणार नाहीत. त्यामुळे मराठी तरुणांनी सावध व्हावे, असा इशाराही त्यांनी दिला.
त्या म्हणाल्या, कधी मराठी भूमीपुत्रांचा मुद्दा तर कधी नरेंद्र मोदी यांचे कौतुक, पुढच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेऊन पवारांचे कौतुक आणि ‘लाव रे व्हिडिओ’ च्या माध्यमातून मोदी यांच्यावर टीका आणि आता मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाचू असा इशारा देऊन समाजात दुही पेरण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्या म्हणाल्या की निवडणूक आली की मनसेला जाग येते. दरम्यानच्या काळात यांचे इंजिन सायडिंगला लागलेल असते. आता तर यांनी भाजपला यांचे इंजिन चालवायला दिले आहे हे दोन सभेतून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे यांच्या बेगड्या हिंदुत्वाला मतदार भुलणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
