Breaking News

बंडखोर शिवसेना आमदार जाधव म्हणाल्या, ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या कोणत्याही नेत्यांनी… काहीतरी त्यामागे कारण असेल, ते शोधणं गरजेचं

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या विरोधात आता शिवसेनेनेही तितकेच जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आजपर्यंत जवळपास सतरा आमदारांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आज सादर करण्यात आला. शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मागील चार दिवसापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिक देखील बंडखोर आमदारांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भायखळ्याच्या आमदार यांमीनी जाधव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यामिनी जाधव यांनी ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या नेत्यांनी साधी विचारपूसही केली नाही असे सांगत काहीतरी त्यामागे कारण असेल ते शोधणं गरजेचे असून हे समजून घेण्याची गरज असल्याचे म्हणाल्या.

माझं कुटुंब सात-आठ महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यात कुणाचं मार्गदर्शन, आधार, सूचना मिळाल्या नाहीत. आम्ही दोघंच हातपाय मारत होतो. या सर्व परिस्थितीमुळे आम्ही या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. हा निर्णय घेणं, सोपं नव्हतं. बऱ्याच दिवसांपासूनची ही प्रक्रिया होती. मनाला आजही यातना होतायत. एक मात्र नक्की आहे की, यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. कॅन्सरच्या अवस्थेत भायखळा विधानसभेतील शिवसैनिकांनी आम्हाला जसं समजून घेतलं, त्याचं शिवसैनिकांनी आता आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाहीत, बेईमानी करणार नाहीत. काहीतरी त्यामागे कारण असेल, ते शोधणं गरजेचं असल्याचेही त्या म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही समजू शकतो. कारण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. यापुढेही शिवसैनिक राहणार. पण आम्ही हा निर्णय का घेतला हे समजून घेणं गरजेचं आहे. व्हिडीओत यामिनी जाधव पुढे म्हणाल्या, गेल्या काही महिन्यांपासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं वादळ आलं आहे. कॅन्सर झाल्याचं जेव्हा मला आणि कुटुंबाला समजलं, तेव्हा सर्व कुटुंब तुटलं. कॅन्सर झाल्याची माहिती आपल्या पक्षाला द्यायला हवी, म्हणून यशवंतराव जाधवांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना याची माहिती दिली. एक महिला आमदार म्हणून माझी अशी अपेक्षा होती की, शिवसेनेचे काही नेते माझ्या घरी येतील, विचारपूस करतील. आपल्या महिला आमदार कॅन्सरने त्रस्त आहेत. हीच गोष्ट मोठी हेलावणारी होती. मी स्वत: कॅन्सरच्या नावानं कोलमडून गेली होती. त्याकाळात भायखळा विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांनी खूप साथ दिली. त्यांचे आजही आभार मानू इच्छिते.

पण शिवसेनेच्या प्रमुख नेत्याकडून माझी विचारपूस केली जाईल. एक आधाराची थाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या कुटुंबाला मिळेल. अशी माझी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही.ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या कोणत्याही नेत्यांनी माझी विचारपूस केली नाही. मी स्वत: २०१२ पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाल्याचं पाहिलं आहे. त्यांच्या पत्नींना रुग्णालयात जाऊन भेटल्याचंही मी पाहिलं आहे. त्यांच्या पत्नींप्रमाणे माझी अगदी मरणाशय्य अवस्था होणं गरजेचं होतं का? मग माझ्या पक्षातील नेते मला बघायला आले असते? ही गोष्ट मनात खलत होती असेही त्या म्हणाल्या.

Check Also

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *