Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, मुस्लिम, गुजराती, अमराठी आमच्यासोबत तुमचा डाव…. ठाकरे परिवार संपवायचा आहे या संपवा आम्हाला हाच माझा परिवार

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची संधी भाजपाबरोबर शिंदे गटाकडून सोडली जात नाही. त्यातच शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा जवळ येत असताना शिवसेनेच्यावतीने मुंबईतील गटनेत्यांचा आणि विभागप्रमुखांचा मेळावा आज गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूकीसाठी काल परवा कोणता तरी केंद्रीय मंत्री आला होता. अमित शाह आला होता. आता कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत म्हणे. त्यामुळे आपल्याला पराभूत करायला आता मोदी येणार आहे. यात घाबरण्यासारखं काहीही नाही. माझा परिवार हा माझ्या समोरचा उपस्थितीत शिवसैनिक आहे. या संपवायला असे आव्हान देत त्यांना ठाकरे कुटुंब संपवायचा आहे. शिवसेना संपवायची आहे. मात्र हा शिवसैनिक तुम्हाला आस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही भाजपाला दिला.

आतापर्यत देशात तुम्ही अनेकांमध्ये फुट पाडण्यात यशस्वी झाला. परंतु मुंबईत तुम्ही हिंदू-मुस्लिम अशी फुट पाडायचा प्रयत्न कराल तर मुस्लिम समाज पण आज आमच्यासोबत आहे. मराठी-अमराठी असा वाद कराल तर तो अमराठीही, गुजरातीही आमच्यासोबत आहे. त्यामुळे यावेळी तुमचा एकही फुटीचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि ते शक्यही होणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

तुम्हाला फक्त मुंबई जिंकायचीय. पण तुम्हाला मुंबई कळलीच नाही. मुंबई जिंकण्यासाठी तुम्हाला मुंबईकरासोबत एकजीव व्हावे लागले. तुम्हाला ते कधीच शक्य नाही. तुमच्यादृष्टीने मुंबई म्हणजे स्वेअर फुटाची जमिन आहे. जी फक्त तुम्हाला विकायची आहे. जर तुमच्यात खरीच हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक एका महिन्यात जाहिर करून दाखवा आणि त्यांच्यासोबत राज्यातील विधानसभेच्या निवडणूकाही जाहीर करा असे आव्हानही उध्दव ठाकरे यांनी भाजपाला दिले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यादिवशी म्हणाले की शेवटची निवडणूक समजून लढा. होय ही तुमची शेवटचीच निवडणूक ठरणार आहे. यापुढे तुम्हाला निवडणूक लढविण्याची पाळीच येणार नाही असा खोचक टोला लगावत आमचं म्हणाल तर इथल्या प्रत्येक शिवसैनिकांनी मुंबई महापालिकेसह सर्व निवडणूका आपली पहिलीच निवडणूक आहे असे समजून लढा असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी करत परंपरेनुसार दसरा मेळावाही शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत. एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजलं, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे. विशेष म्हणजे मुंबईवरती सध्या गिधाडं फिरायला लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयाची आहे. त्यामुळे मुंबईवर लचके तोडणारी गिधाडांची अवलाद फिरायला लागली आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे अशी टीकाही त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर केली.

अमित शाहांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत आम्ही मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून आले होते. त्याच कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत. देशाचे गृहमंत्री असूनही मुंबईत येऊन ते काय बोलून गेले? तर शिवसेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहीत नाही, इकडे जमिनीतून फक्त गवताची पाती उगवत नाहीत, तर तलवारीची पातीही उगवतात. तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, पण आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आज मी ठणकावून सागतोय, असंही ते म्हणाले.

मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? यांच्यासाठी मुंबई ही केवळ विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. १०५ वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असेही ते म्हणाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गल्लीत गोंधळ असताना दिल्लीत मुजरा करायला जातात, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. या सरकारने आधी खोक्यातून बाहेर यावं, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारने आपण घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. राज्यातून एक-एक उद्योग निघून जात आहे. मात्र, मिंधे गट ‘होय महाराजा’ करत चूपचाप बसला आहे. आज सुद्धा मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत. गल्लीत गोंधळ असताना ते दिल्लीत मुजरा करत आहेत. दिल्लीसमोर किती वेळा झुकले असतील. याची कल्पना नाही. मात्र, महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीला ठणकावून का नाही सांगत, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयातून येणारा निर्णय हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नाही, तर देशात लोकशाही जिंवत आहे की नाही हे ठरवणारा आहे. आज हे लोकं भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत. मात्र, भ्रष्टाराबाबत बोलायची यांची लायकी नाही. ‘खोके सरकार’ अशी यांची ख्याती झाली आहे. आधी त्यांनी खोक्यातून बाहेर यावं आणि मग भ्रष्टाचारावर बोलावं असे आव्हानही त्यांनी दिले.

मी व्यासपीठावर आल्यावर दोन गोष्टी पहिल्या, एक म्हणजे रिकामी खुर्ची जी संजय राऊतांची आहे. यामुळे मी एक खुलासा करून टाकतो, नाहीतर उद्या बातमी यायची संजय राऊत मिंधे गटात गेले. खरं तर, मिंधे सगळे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून तलवार हातात घेऊन आघाडीवर लढत आहेत असेही ते म्हणाले.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *