Breaking News

ठाकरेंचा सवाल, मग आता काय राष्ट्रीय मुस्लिम संघ का पाकिस्तान जनता पार्टी म्हणायचे? खासदार आणि जिल्हा प्रमुखांना संबोधित करताना साधला भाजपावर निशाणा

आम्ही हिंदूत्वासाठी राजकारण करत होतो. पण ते राजकारणासाठी हिंदूत्व करत आहेत असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर करत पंचायतीपासून ते दिल्लीपर्यत सर्व ठिकाणी बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आपण लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर गांभीर्याने घेत नाही. पण आता तसं करुन चालणार नाही. भाजपाचं पंचायत ते संसद असं स्वप्न असून या सत्तेच्या ठिकाणी दुसरं कोणी असता कामा नये या त्यांच्या धोरणाला रोखलं पाहिजे. आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे. हे आपलं हिंदुत्व नव्हते असेही ते यावेळी म्हणाले.

मध्यंतरी काही जण म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मागच्या ७ वर्षात मिळाले आहे. मग या सात वर्षात काय केले त्यांनी? तर एकही सांगता येणार नाही. फक्त काहीजणांचा दाऊदशी संबध जोडण्याचे आणि तर काही जणांना पाकधार्जिणे ठरविण्याचे काम यांनी केले आहे. मग मागील काही काळात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत त्यांनी जी वक्तव्ये केली या देशात राहणारे सर्वजण हिंदूच आहेत. मुस्लिम जरी असले तरी ते हिंदूच आहेत. देशाच्या जडणघडणीत मुस्लिमांचाही सहभाग असल्याचे ते म्हणाले. मग काय आता राष्ट्रीय मुस्लिम संघ असे संघाला म्हणायचे का? देशाच्या राष्ट्रपती पदासाठी अब्दुल कलाम यांचे नाव कोणी सुचविले, पाकिस्तानसोबत बस सेवा कोणी सुरु केली? त्यावेळी आम्हीच म्हणालो होतो की दिल मिले ना मिले हात जरूर मिलाते रहेना चाहिए. अचानक पणे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवासाला केक खायला कोण गेले? या सर्व गोष्टी यांच्याच काळात झाल्या. म्हणजे तुम्ही जे मुस्लिम धार्जिणे करताय ते देशप्रेम आणि आम्ही काय केले की देशद्रोह म्हणून तुम्हाला काय पाकिस्तान जनता पार्टी म्हणायचे की हिजबुल जनता पार्टी म्हणायचे असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

आम्ही भाजपाला सोडलं आहे, हिंदुत्वाला नाही याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. सत्ता असो किंवा नसो आम्ही हिंदुत्वाला सोडणार नाही असे सांगत भले सत्ता मिळत असली तरी आम्ही एमआयएमशी युती करणार नसल्याचे सांगत विरोधकांचं धोरण ओळखा. भाजपाकडे आपण काय केलं हे सांगण्यासारखं नाही, म्हणून आपल्यावर टीका करत आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी दैदीप्यमान विजय मिळवला असे काही नाही. समाजवादी पक्षाच्या जागाही वाढल्या आहेत. एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि संमोहन करत आहेत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेला जनाबसेना म्हटलं जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. आत डाव पहा…काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा भ्रम निर्माण केला जात आहे. एक दिवस कदाचित हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असंही म्हणायला ते कमी करणार नाहीत. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असंही म्हणतील पण तो त्यांचा मानसिक आजार असेल. आपला तो बाब्या आणि दुसरा तो गुंड अशी त्यांची मानसिकत झाली असल्याची टीका त्यांनी केली.

दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड हा प्रकारही लोकांच्या नजरेत आणला पाहिजे. यांचे नुसते जबाब घेतले तर तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात असा संताप व्यक्त करत अधिवेशनाच्या आधी भुजबळांनी त्यांच्या घऱी सर्वांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी यावर चर्चा झाली असता भाजपात आणि आपल्यात फरक असून आपण खोटं बोलू शकत नाही हा मुख्य फरक असल्याचं मी सांगितले. खरं बोलणं हा अवगुण ठरत आहे पण खोटं बोलून जिंकावं लागत असेल तर त्यासारखं दुर्दैव नाही. जर भाजपा अशाच पद्दतीने लढत जिंकत राहिला तर सत्यमेव जयतेच्या जागी असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य ठेवावं लागेल असेही ते म्हणाले. हायकोर्टाने विधानपरिषद सदस्य नियुक्तीवरुन राज्यपालांवर ताशेरे ओढल्याचा संदर्भ देत हा लोकशाहीचा खून नाही का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *