Breaking News

उध्दव ठाकरे यांचा निर्धार, माझ्यावर दबाव असला तरी मातोश्रीवर आरोप करणाऱ्यांबरोबर बसणार नाही मी शांत आहे षंड नाही...

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाची पारडे जड होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विभाग प्रमुखांशी आज ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असं वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं विसरुन जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात असं भावनिक आवाहन केले.

आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे अशी टीकाही त्यांनी केली. यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करायचं नाही का? अशी विचारणाही त्यांनी केली. हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपासोबत जाण्यासाठी दबाव असल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

कोरोनाचं संकट गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. कोरोनाचा त्रास संपत असतानाच मानेचा त्रास सुरु झाला आहे. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता असेही ते म्हणाले.

मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितलं होतं. पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरीरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचे लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आमदार गुजरातला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर काही आमदारांना निवासस्थानी बोलावले होते अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी काही झालं तरी सोडून जाणार नाही सांगितले होते. पण त्यावेळी उपस्थित असणारे दादा भूसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचं करायचं काय? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी करत वाईट वाटत असल्याचेही नमूद केले.

काही आमदार तिकीट कापलं तरी जाणार नाही असं म्हणाले होते. पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. निधी मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या. मी तर सर्व पातळीवर निधी वाटपाचं काम करत आलो आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदं दिली असा उल्लेख त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख न करता केला.

तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजववेली मूळं आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करु शकत नाही. त्यांनी जावं, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपासोबत जावं यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मी शांत आहे षंड नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आपण प्रत्येक वेळी त्यांना महत्वाची खातं दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असतं, पण त्यांना दिलं. संजय राठोड यांचं वनखातं माझ्याकडे घेतलं. साधी खाती मी माझ्याकडे ठेवली. मला आता या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही, तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आपल्या माथी अनेकदा पराभव झाला, पण त्याने फरक पडत नाही. जिंकणं, पराभव मनावर अवलंबून असतं. हारल्यानंतर जिंकण्यासाठी जनता साथ देत असते. बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. सेनेत माझ्यासोबत जी बुडेल ती निष्ठावंत सेना आहे असा टोलाही त्यांनी लगावत जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे समजा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तुम्हाला तिथे भवितव्य दिसत असेल तर खुशाल जावा, मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी हे पद आनंदाने सोडण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *