Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते खरं हिंदूत्व असेल तर काश्मीरींच्या संरक्षणासाठी जा

मी पोहोचल्यानंतर थोडंस हॉटेलमध्ये टिव्ही पहात होतो. त्यावेळी काही चॅनेलवर तोफ धडाडणार वगैरे असे सुरु होतं. मात्र ढेकणांना चिरडायला तोफेची गरज लागत नाही. तसेच त्या तसल्या फालतू गोष्टीसाठी माझ्या शिवसैनिकांची ताकद मी वाया घालविणार नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केली.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील आयोजित सभेत ते बोलत होते. ही जाहिर सभा मराठवाडा मित्र मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
आमचं हिंदूत्व हे दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या धर्माला विरोध करण्याचे शिकवित नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी सांगितले की दुसऱ्या धर्माच्या लोकांचा द्वेष करा, त्यांच्यावर हल्ले करा, ते देशद्रोही म्हणून त्यांच्याविरोधात बोला असे कधी सांगितले नाही. धर्म हा घरात ठेवून यायचा असतो आणि बाहेर आल्यावर एकच धर्म असतो तो म्हणजे राष्ट्रधर्म असे सांगत हे सांगणारा आमचे हिंदूत्व असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून काश्मीरी पंडितांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. त्यांना पुन्हा पळवून लावले जात आहे. जर तुमचं खरे हिंदूत्व असेल आणि तुम्ही मर्द असाल तर त्यांच्या रक्षणासाठी तिकडे काश्मीरात जा आणि तुमचं हिंदूत्व दाखवून द्या असे आव्हानही त्यांनी भाजपाला केले.

याचं हिंदूत्व म्हणजे इतर धर्मियांच्या विरोधात बोला, कुठे मस्जिदीखाली शिवलिंग शोधा, कुठे आणखी काही शोधा हे यांचे असले हिंदूत्व अशी टीका करत ते पुढे म्हणाले की, असलं हिंदूत्व आमचं कधीच नाही. त्यांच्या एका प्रवक्त्यामुळे संपूर्ण देशाला माफी मागायची मागणी अरब राष्ट्रांनी केली. हे कोणामुळे घडले, आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे फोटो कचऱ्याच्या डब्यावर लावले जात आहेत. इतका देशाचा अपमान कोणामुळे होतोय. हे फक्त भाजपाचे पाप असून त्याबद्दल भाजपानेच त्यांची माफी मागायला हवी देशाने नाही अशी टीकाही त्यांनी केली.

देशाची सत्ता यांच्या हातात पण यांची वागणूक एखाद्या प्रमुख विरोधी पक्षासारखी आहे. हेच एकाला भोंग्याचा आवाज करायला सुपारी देणार तर एकाला हनुमान चालिसा म्हणायला सांगणार असा आरोपही त्यांनी भाजपावर केला.
संभाजीनगरच्या विषयी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा ते यावेळी महापौर आम्हाला द्या, अशी मागणी केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाही. देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा असेही ते म्हणाले.

हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली. भाजपाने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर तेही करू. कोणी कसलंही हिंदूत्व घेवून आमच्यावर चालून येण्याचा प्रयत्न करेल तर त्यास आमच्याकडूनही प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईत औरंगाबाद मेट्रो आणि इतर विकास कामांची घोषणा करणार नाही. व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार करणार आणि मगच विकास करणार आहे. विकासाच्या नावावर शहर उद्ध्वस्त करणार नसल्याचेही ते म्हणाले.

मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *