Breaking News

शिवसेना आमदार दानवेंनी काढली भाजपाच्या दाव्यातील हवा ते वक्तव्य पालघर निवडणूकीच्या वेळचे

औरंगाबाद-मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अवमान करणारे वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यास सुरुवात झाली. मात्र भाजपाकडून करण्यात येत असलेला तो आरोप उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना केला नसून तो मुख्यमंत्री होण्याआधी पालघर येथील पोटनिवडणूकीत केल्याचा दावा शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी करत भाजपाच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला.

नारायण राणे प्रकरणानंतर भाजपाने आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून या दोघांच्या विरोधात यवतमाळ पाठोपाठ आज नाशिकमध्ये पोलिसांमध्ये तक्रार अर्ज दाखल करत गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपाच्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली.

दरम्यान यासंदर्भात आमदार अंबादास दानवे यांचा एक व्हिडीओ शिवसेनेकडून व्हायरल करण्यात आला असून त्यामध्ये दानवे म्हणतात की, भाजपा खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पालघरची पोट निवडणूक जाहीर झाली. त्यावेळच्या प्रचारा दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पालघरला आले होते. त्यांनी प्रचार सभेला उपस्थित राहण्यापूर्वी तेथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पायात चप्पल घालून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवसेना उमेदवारासाठी झालेल्या प्रचार सभेत उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत त्याच चपलांनी मारले पाहिजे असे वक्तव्य केले होते.

त्यावेळी उध्दव ठाकरे हे कोणत्याही वैधानिक पदावरही नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद होवू शकत नाही. तसेच ही घटना भाजपाने तपासून घ्यावी असे आवाहन करत कट्टर हिंदूत्वादी असलेल्या योगींनी पायात चप्पल घालून छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालणे भाजपाला चालते का? असा सवालही त्यांनी भाजपाला केला.

त्यामुळे भाजपाने आरोप करण्यापूर्वी ती घटना तपासून घ्यावी आणि राज्यातील जनतेलाही माहित करून द्यावे असे आवाहन त्यांनी करत भाजपाच्याआरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *