Breaking News

मतफुटीप्रकरणी भाजपा आमदार म्हणतो, मंत्री सत्तारांनीच आम्हाला मदत केली रावसाहेब दानवे पुत्र आमदार संतोष दानवे यांचा गौप्यस्फोट

राज्यातून राज्यसभा सदस्य म्हणून निवडूण जाण्याकरीता झालेल्या निवडणूकीत अपेक्षितरित्या महाविकास आघाडीच्या चवथ्या उमेदवाराचा पराभव होत भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय झाला. या निवडणूकीत भाजपाने घोडेबाजार केल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी करत काही अपक्ष आमदारांची आणि छोट्या पक्षांची नावे घेतली. त्यानंतर या अपक्ष आमदारांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत टीकाही केली. त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार संतोष दानवे यांनी मात्र भाजपाला अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते मिळवून देण्यात शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीच मदत केल्याचा गौप्यस्फोट केला.

रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे हे भाजपाचे भोकरदन येथील आमदार आहेत. संतोष दानवे हे जालन्यात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला.  अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही करावी अशी अपेक्षा आमदार दानवे यांनी व्यक्त केल्याने राजकिय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.

अब्दुल सत्तार ज्या पक्षात आहेत ते कधीच त्या पक्षात नसतात. अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी सत्तारांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सत्तार हे निश्चितपणे ज्या पक्षात असतात ते कधीच त्या पक्षासोबत नसतात हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांनी १०० टक्के आम्हाला मदत केली आहे. त्यांचे तोंडच असे आहे की ते बाजारात कोण कुठे गेले आणि कोण कुठे चालले आहे हे बघत फिरत असतात. अशा पद्धतीने आम्हाला माहिती मिळत असते. हीच मदत आम्हाला विधान परिषदेसाठी अपेक्षित आहे आणि तंतोतंत ते याचे पालन करतील असेही ते म्हणाले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *