Breaking News

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ राजभवनात झाला समारंभ भाजपाचे अनेक केंद्रीय मंत्री आणि आमदार सहभागी

राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून २४ तासही उलटत नाही, तोच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ दिली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ दिली. हा समारंभ राजभवनातील नव्याने उद्घाटन केलेल्या दरबार हॉलमध्ये पार पडला.

सुरुवातीला राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या ५० आमदारांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले. तसेच या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही जाहिर केले. पहिल्या टप्प्यात आजच संध्याकाळी ७.३० वाजता एकट्या एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे जाहिर केले होते.

मात्र नंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडावी असे पत्रकारांशी बोलताना आवाहन केले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही फडणवीस यांच्याशी चर्चा केली. परंतु फडणवीस यांनी सुरुवातीला नकार कळविला. मात्र नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्यानंतर अखेर फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार झाले.

दरम्यान महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जे.पी.नड्डा यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक राजकिय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *