Breaking News

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचे अपघातात निधन; बीडला होणार अंत्यसंस्कार राजकिय आणि मराठा समाजाकडून हळहळ

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ खालापूरचा टोल नाका पार केल्यानंतर हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात पहाटे ५ वाजून ५ वाजता घडला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार राहीला आहे. त्यांच्यावर उद्या संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांना तातडीने पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली.

विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत बीडहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली.

विनायक मेटे यांचे पार्थिव काही वेळानंतर जे जे रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्यांचे शवविच्छेधन करण्यात आले. त्यानंतर मेटे यांचे पार्थिव त्यांच्या वडाळा येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार असून नंतर एअर अॅम्ब्युलन्सने बीडला नेण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आल्याची माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे गाडीचे ड्रायव्हर एकनाथ कदम यांने दूरचित्रवाहिनींशी बोलताना दिली.

एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटेंचा मृत्यू डोक्याच्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याची शक्यता आहे. विनायक मेटेंचा अपघात पहाटे ५ च्या सुमारास रसायनीजवळ झाला. त्यांना फार गंभीर जखमा झाल्या होत्या. बहुतेक त्यांचं घटनास्थळीच निधन झालं होतं. त्यांना ६ वाजून २० मिनिटांनी आमच्या रुग्णालयात आणलं गेलं. इथे आणल्यानंतर त्यांना लगेच तपासण्यात आलं. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्यासोबत गाडीचे चालक आणि बॉडिगार्ड होते. बॉडिगार्डला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सलगोत्रा यांनी दिली.

त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर जखम झाली होती. अशा वेळी जागेवरच मृत्यू झाला असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच ही बाब स्पष्ट होऊ शकेल असेही ते म्हणाले.

निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *