Breaking News

महाडग्रस्तांसाठी अन्नाची पाकिटे, कपडे पाठवा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुटका करणे सुरु : दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरलं आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

माणगाव पाचाड मार्गे महाड रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव दापोली रस्ता सुरु झाला आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली. कोंझर पासून पुढे तेटघर पर्यंत रास्ता मोकळा करण्यात आला आहे. तेटघर पासून पुढे मोहोप्रेमार्गे आचळोली कडून नातेखिंडला पोहोचता येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थांना आवाहन

माणगाव येथे सुमारे २००० फुड पॉकेट्स तयार आहेत. सकाळी १० वाजेपर्यंत अजून २००० अन्नाची पाकिटे  तयार होतील . याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत.  माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे.  स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी  असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

आरोग्य यंत्रणा सज्ज

महाड मधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी  घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामुग्री आहे अशी माहिती यावेळी  देण्यात आली. एमआयडीसी चे अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरले आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *