Breaking News

१० वी- १२ वी परिक्षेच्या एक दिवस आधी पर्यंत परिक्षा अर्ज भरा विलंब शुल्क भरण्याची गरज नाहीः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

कोरोना संसर्गजन्य आजार आणि ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे राज्यातील एकही विद्यार्थी १० वी १२ वीच्या परिक्षेपासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून या दोन्ही परिक्षांच्या एक दिवस आधीपर्यंत परिक्षेचा अर्ज कोणत्याही विलंब शुल्काशिवाय भरून घेण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळास देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकही विद्यार्थी परिक्षांपासून वंचित राहणार नसल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.

यासंदर्भात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यास उत्तर देताना मंत्री गायकवाड यांनी वरील उत्तर दिले.

कोविड काळात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांच्या फी माफीच्या अनुषंगाने यावेळी विधान परिषद सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच आता परिक्षा अर्ज भरण्याच्या कालावधीपर्यंत अनेकांना पैशाची अडचण असल्याने त्यांना अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे असे विद्यार्थी परिक्षांपासून वंचित राहुन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

त्यावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, १२ वीच्या परिक्षा या ४ मार्च २०२१ पासून सुरु होत आहेत. तर १० वीच्या १५ मार्च पासून सुरु होत आहेत. मात्र काही आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी या परिक्षांपासून वंचित राहु नये या उद्देशाने १२ वी परिक्षेचा अर्ज ज्या विद्यार्थ्यांनी भरला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ३ मार्च पर्यंत अर्ज भरण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. तर १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १४ मार्च पर्यंत अर्ज भरण्याची मुदत निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर यापूर्वी दिलेल्या मुदतीत अर्ज भरता न आल्यास विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारून त्याचा अर्ज भरून घेतला जात असे. परंतु यावेळी परिक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

त्याचबरोबर कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगत अशा विद्यार्थ्यांची फी सरकारकडून भरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *