Breaking News

संजय राऊतांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसादः पण हक्कभंग प्रस्तावावर अध्यक्षांची स्पष्टोक्ती दोन दिवसात तपासणी करून हक्कभंगाबाबत निर्णय घेऊ

संजय राऊतांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधताना राज्यात विधिमंडळ नाही, तर ४० जणांचे चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले असून या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाखाली कारवाई करावी अशी मागणी केली. या मुद्यावरून सभागृहात चांगलेच रणकंदन माजले. त्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
विधानसभेचे नियमित कामकाज सुरु होताच याविषयीचा मुद्दा सभागृहात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित करत संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे विधानसभेत भाजपा-शिंदे गट विरूध्द महाविकास आघाडी असा गदारोळ पाह्यला मिळाला.
यासंदर्भात बोलताना भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले, संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. एखाद्याचा राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र, या विधिमंडळाचा अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विधिमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्र द्रोह असल्याचा आरोप केला.
या आरोपानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शेलारांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत, आपण कोणत्याही पक्षाचे असतो, तरी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण करतो. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कोणालाही चोर म्हणण्याचा अधिकार नाही. मी काही वेळापूर्वी यासंदर्भातील बातमी वाचली. खरं तर आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे. राजकीय मतभेद बाजुला ठेऊन हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मात्र, संजय राऊत खरोखरच असे बोलले का? हे सुद्धा तपासण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
त्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांविरोधात हक्कभंगांची कारवाई करण्याची मागणी केली. संजय राऊत यांनी वक्तव्य केलेला व्हिडिओ आम्ही पाहिला आणि ऐकला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे विधिमंडळाला चोरमंडळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी निवडूण दिलेल्या सदस्यांच्या विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणे कितपत संयुक्तीक आहे असा सवाल करत संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव अध्यक्षांनी दाखल करून घ्यावा आणि राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
भातखळकर यांच्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, जनतेने निवडूण दिल्यानंतरच या सभागृहात येता येते. परंतु लोकप्रतिनिधींच्या सभागृहाला कोणी चोरमंडळ कोणी म्हणत असेल तर ते चुकीचेच आहे. त्याचे आम्ही समर्थन करत नाही. परंतु संजय राऊत हे काय बोलले आम्ही तर ऐकले नाही की पाहिले नाही. त्यामुळे हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याआधी संजय राऊत नेमके काय म्हणाले ते तपासण्याची गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच विरोधकांनी राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला म्हणून विरोधकांना देशद्रोही म्हणणे कितपत योग्य असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या अनुषंगाने देशद्रोही म्हणून केलेले वक्तव्यही तपासावे लागेल असे मतही थोरात यांनी व्यक्त केले.
यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले हे म्हणाले, संजय राऊत यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप आम्ही पाहिली आहे. त्यामुळे राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
त्यानंतर सभागृहात सत्ताधारी शिंदे-भाजपा विरूध्द महाविकास आघाडी असा संघर्ष पहायला मिळाल्याने. या गदारोळात विधानसभेचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत नेमके काय म्हणाले हे तपासून दोन दिवसात निर्णय घेवून त्यानुसार हक्कभंग प्रस्तावाबाबत निर्णय घेऊ असे सांगत विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Check Also

नाना पटोले यांची ग्वाही, आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध

काँग्रेस व इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी, दलित, भटके, विमुक्त जातीच्या लोकांसाठी न्याय पत्रात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *