महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत नेमका कोणता पक्ष विजयी होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच महाराष्ट्रातील निवणूक निकालाची पुर्नरावृत्ती किमान दिल्लीत तरी होणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत होती. मात्र दिल्लीत भाजपाला ४६ विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला, तर आम आदमी पार्टीला २२ ठिकाणी विजय मिळाला. त्यानंतर काँग्रेस आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, आम आदमी पार्टीच्या पराभवाने जर अण्णा हजारे आणि काँग्रेसला आनंद झाला असेल तर याचं दुःख वाटतयं असे मत व्यक्त केले.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूकीत जय-पराजय होत असतात, मागील १० वर्षापासून लोकशाही पद्धतीने निवडणूका लढविल्या जात नाहीत. निवडणूक सैतानी पद्धतीने लढविल्या जात आहेत. आम्हाला कोणत्याही पद्धतीत विजय मिळवायचाच आहे या पद्धतीने निवडणूका लढविल्या जात आहेत. त्यासाठी मग साम-दाम-दंड भेद अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. मतदार यांद्यामधील घोटाळा जो महाराष्ट्रात पाहिला तोच दिल्लीत पाह्यला मिळाला. उद्या बिहार मध्ये हेच दिसेल असे सांगत हरियाणात हेच दिसले पण या सर्वाचा बाऊ न करता आम्हा सर्व विरोधकांना लढाईसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर चित्र वेगळे दिसले असते. हे आकड्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे एकत्र यायचं की नाही याबाबत सर्वांनी भूमिका घेण्याची गरज असल्याचे सांगत अन्यथा जे सध्या सुरु आहे त्याला मान्यता दिली पाहिजे. आता या गोष्टींचा विचार कऱण्याची वेळ आली आहे असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अण्णा हजारे काय बोलतात त्याला काही अर्थ आता राहिला नाही. ते अचानक जागे होतात, महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार झाला, लोकशाहीवर हल्ला झाला, तरीही अण्णा हजारे यांनी कोणतीच हालचाल केली नाही. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मी पाहिला हे लोकशाहीला मारक आहे. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी एक मोठं आंदोलन देशात उभं केलं होतं. त्यामुळे अण्णा हजारे देशाला माहित झाले. पण देशात अनेक संकट आली, देश लुटला जातोय अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ज्यांच्यावर झाले ते सर्व जण भाजपासोबत आहेत. मग अण्णा हजारे यांना त्यावर मत व्यक्त करावं असं का वाटत नाही, त्या मागे रहस्य काय असा सवालही यावेळी उपस्थित केला.
