Breaking News

बच्चन यांच्या दिवार चित्रपटाप्रमाणे त्यांच्या कपाळावर गद्दार असा शिक्का

शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवर उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, जे आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे लिहिले होते, उद्या ह्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना लोकं गद्दारांची नातेवाईक म्हणतील, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. या आमदारांच्या कपाळावर गद्दार हे शब्द कोरले गेले आहेत. त्यांच्या पिढ्यांपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही, असेही ते म्हणाले.

तसेच शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असं होत नाही. ४० नेते गेले तरी, पक्ष जमीनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही, असेही ते म्हणाले.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले जे खासदार-आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी परत निवडून दाखवावे. खासदार गोडसे यांची राजकीय कारकीर्द संपली आहे. आम्ही सतत लोकांमध्ये फिरतो आहे. लोकांच्या मनात गद्दारांबद्दल चीड आहे. लोकं शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत असे त्यांनी सांगत कालपासून मी नाशिकमध्ये आहे. येथे सर्वांना भेटतो आहे. लोकं त्यांना खोकेवाले बोलतात, असा उपरोधिक टीकाही केली.

यावेळी पत्रकारांनी दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील मदभेदाबाबत विचारले असता, मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल, असे भाकितही केले.

दरम्यान, भाजपा नेते नारायण राणे यांनी संजय राऊत हे आता सामनाचे संपादक नाही तर सहसंपादक आहेत, असा टोला लगावला होता. त्यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचे डोक ठिकाणावर नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मी ‘सामना’मध्ये ज्या पदावर होतो, त्याच पदावर आहे. मी तुरुंगात असतानाही त्याच पदावर होतो, असे प्रत्तुतरही त्यांनी दिले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *