Breaking News

मंत्री संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा, तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर राठोड यांचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांचा समावेश करताच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या विरोधात न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे जाहिर केले. यापार्श्वभूमीवर आज संजय राठोड यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राठोड म्हणाले, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली असून आपल्याला क्लिन चीट मिळाली असल्याचा दावा केला.

मागील पंधरा महिन्यांपासून मी आणि माझं कुटुंब मानसिक तणावात होतं. त्यातून कुणीही जाऊ नये. गेली ३० वर्षे राजकीय-सामाजिक जीवनात मी वावरत आहे. चार वेळा प्रचंड मताधिक्यानं निवडूनही आलो आहे. अशा स्थितीत माझं राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रकार झाला. त्या सर्व परिस्थितीला मी सामोरं गेलो. माझ्यावर आरोप झाल्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी, म्हणून मी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण माझ्यावर झालेल्या आरोपात काहीही तथ्य आढळलं नाही, याबाबतच पत्रक पुणे पोलिसांनी जारी केले असल्याचा दावाही त्यांनी केला.

न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर माझा विश्वास होता, म्हणून मी आतापर्यंत शांत होतो. पण तपासानंतर आता सर्व सत्य बाहेर आलं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, मलासुद्धा परिवार आहे, मुलंबाळं आहेत, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहेत. अशा गोष्टीचा किती त्रास होतो, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. आतापर्यंत मी शांत होतो, पण येथून पुढे असंच वातावरण राहिलं तर मी कायदेशीर मार्गही अवलंबणार आहे. संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवणार असल्याचा इशाराही चित्रा वाघ यांचे नाव न घेता दिला.

तसेच या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आपण चित्रा वाघ यांना पाठविण्याची व्यवस्था करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूजा चव्हाण प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी पुणे न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण न्यायालयाने दोन्हीही याचिका फेटाळून लावल्या आहेत. आतापर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ आरोप झाले, म्हणून माझ्यामागे चौकशी लावण्यात आली होती. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी म्हणून मी मंत्रीपदावरून बाजूला झालो होतो असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *