Breaking News

सचिन पायलट यांचा आरोप, मुठभर श्रीमंतांवर भाजपा सरकारचा कर सवलतींचा वर्षाव तर… जीएसटीच्या जाचातून छोटे, लघू, मध्यम व्यापारी व सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा

भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने येत्या अर्थसंकल्पात जीएसटीमध्ये बदल करत जीएसटी २.० आणावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सचिन पायलट म्हणाले की, १ फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपा सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन जीएसटी या अत्यंत किचकट, दहशत निर्माण करणाऱ्या कर रचनेत बदल केला पाहिजे. २०२१-२२ या वर्षात एकूण जीएसटीपैकी जवळपास दोन तृतीयांश किंवा ६४% लोकसंख्येच्या तळातील ५०% लोकांकडून आले तर फक्त ३% GST वरच्या १०% मधून आला. हा गरिबांवरचा कर आहे जो सतत वाढत जातो. आरोग्य विमा सारख्या अत्यावश्यक सेवांवर जीएसटी दर हा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १८% आहे. पॉपकॉर्नवर सुद्धा तीन प्रकारचा जीएसटी लावला जात आहे.

सचिन पायलट पुढे बोलताना म्हणाले की, मोदी सरकार दरवर्षी रेकॉर्डब्रेक कलेक्शनचा दावा करते पण जेव्हा श्रीमंतांचा विचार केला जातो, तेव्हा २०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २ लाख कोटी रुपयांची कपात केली. पंतप्रधान मोदी अरबपतींसाठी मोठी कर कपात देतात आणि गरीब आणि मध्यमवर्गांवर मात्र करांचा भार टाकतात. जीएसटीची विक्रमी वसुली होत असून देशातील सर्वात जास्त जीएसटी मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून जमा होतो. या घटकावरचा जीएसटीचा भार कमी करण्याची वेळ आली आहे त्यादृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा व आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात जीएसटी GST २.० आणावा.

पुढे बोलताना सचिन पायलट म्हणाले की, जीएसटीचा प्रस्ताव सर्वात प्रथम डॉ. मनमोहनसिंग यांनी आणला होता, त्याला भाजपाने तीव्र विरोध केला होता, आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोध केला होता. आधार कार्ड, डीबीटी, किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक या सर्वांना भाजपा व मोदींनी विरोध केला होता पण सत्तेत येताच काँग्रेसच्याच या योजना भाजपाने राबवल्या. जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजता मोठा गाजावाजा करून काहीतरी विक्रमी करत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकीला काँग्रेसचा विरोध नाही पण ती मनमानी पद्धतीने केली जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे.

सचिन पायलट पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण वास्तविकता वेगळी आहे. जीडीपीमध्ये मोठी घसरण होत आहे. भारताला १० टक्के जीडीपीचे लक्ष्य ठेवून वाटचाल करावी लागेल पण भाजपा सरकार कोणतेच खरे आकडे जाहीर करत नाही. भाजपा सरकारमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना जी वस्तुस्थिती आहे ती मांडली जात होती. दरडोई उत्पन्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार निर्मिती होत नाही देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, तसेच महागाईसुद्धा वाढलेली आहे, असेही पायलट म्हणाले.

इंडिया आघाडी मजबूतच आहे..

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले की, लोकशाही, संविधान व देश हित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात याचा अर्थ इंडिया आघाडी कमजोर झाली, असे म्हणता येणार नाही असेही पायलट यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला CWC सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार अमिन पटेल, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते भरतसिंह, झिशान सय्यद आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *