Breaking News

सरसंघचालक म्हणाले, अखंड भारताचे स्वप्न १०-१५ वर्षात पूर्ण होणार उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

मागील तीन महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तराखंड राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल अशी मोठी घोषणा करत हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो. मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल असे सांगत मोहन भागवत यांनी आगामी काळात दंडुकेशाहीनेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची वाटचाल होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

हरिद्वार येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी येथील काही साधू-संतानी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे अशी मागणी केली.

मोहन भागवत यावेळी बोलताना म्हणाले की, संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल. पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षात अखंड भारत होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारताची कल्पना मांडताना म्हटलं की, हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षात पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार? असे प्रश्नार्थक उत्तरही त्यांनी यावेळी दिले.

सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांचंही आम्हाला सहकार्य आहे. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता तर हिंदू जागा झाला नसता आणि झोपूनच राहिला असता. धर्माचं उत्थान होईल तरच भारताचं उत्थान होईल आणि याला विरोध करणारे संपतील असंही त्यांनी सांगितले.

अखंड भारताचे स्वप्न हे स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंदम यांचे असून ते लवकरच आता सत्यात उतरेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. याशिवाय कोणताही देव हा स्वत: काही करत नाही. तर तो करवून घेतो. जसे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून करवून घेतले तसे या गोष्टी आपल्या माध्यमातून करावयाच्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

धर्माशिवाय देशाचे उत्थान नाही. त्यामुळे धर्माचे उत्थान करत देशाचे उत्थान करण्याचे काम सुरु झाल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

दरम्यान, मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात भारतात एकाचबाजूचा आणि एकाच धर्माचा भारत निर्माण करण्याच्या हालचाली आणखी प्रखरपणे सुरु होतील याच शंका नाही. त्याचबरोबर अखंड भारताच्या नकाशात पाकिस्तान आणि बांग्लादेश पुन्हा जोडले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.