Breaking News

अमित शाह यांचा आरोप, उध्दव ठाकरेंनी धोका दिला… जमिन दाखविण्याची वेळ आलीय भाजपा आमदारांच्या बैठकीत अमित शाह यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राज्यात शिवसेनेतील बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर गणेशोस्तवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपा आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव अमित शाह यांनी घेत उध्दव ठाकरे यांनी धोका दिला असा आरोप करत राजकारणात काहीही करा पण धोका सहन करू नका असा इशाराही दिला.

लालबाग राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. तेथे आयोजित भाजपा आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी वरील आरोप केला. यावेळी भाजपाचे विधान परिषद आणि विधानसभेतील सर्व आमदार आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर २०१४ साली केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने आपल्याशी युती तोडली असे सांगत मोदी आणि फडणवीस यांच्या नावावर मतं मागून जिंकून आल्यावर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोपही करत उध्दव ठाकरेंना जमीन दाखविण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी भाजपा आमदारांना सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल अशी घोषणा भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केली.

जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा शाह यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार. आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला.

महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारणं आपल्याला संपवायचं आहे. मोदी, फडणवीसांच्या नावाने मतं मागून तुम्ही जिंकलात आणि विश्वासघात केला. तुमचा पक्ष आज छोटा झाला यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, असेही त्यांनी उध्दव ठाकरे यांना सुनावलं.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *