परभणीतील राज्यघटनेची विटंबना झाल्याच्या प्रकरणी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र या आंदोलनात चुकीच्या पद्धतीने सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक केली. त्यानंतर पाच दिवसांनी सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना कळवली. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी जात सोमनाथच्या आई आणि भावाशी संवाद साधला.
जवळपास अर्धा तास राहुल गांधी यांनी सोमनाथच्या आईशी आणि भावाशी चर्चा करत या घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट पाहिला, तसेच त्याच्या शिक्षणाची कागदपत्रे आणि इतर काही फोटोग्राफही यावेळी दाखविले.
या भेटीनंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करण्यात आलेली आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोस्ट मार्टेम रिपोर्ट त्याच्या घरच्यांनी दाखविला. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे. की अनेक जखमांमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं लिहिलं आहे. ही हत्या कस्टडीयल डेथचे आहे. तसेच या प्रकरणात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाईही झालीच पाहिजे. केवळ पोलिसांना सांगता यावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केल्याचा आरोपही यावेळी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट लिहिलेले असतानाही राज्याचे मुख्यमंत्री सोमनाथचा मृत्यू हा हार्ट अॅटकने झाल्याचं सांगत आहे. मात्र ते त्यांच्या खोटे बोलण्यातून पोलिसांना संदेश देत होते की त्याचा मृत्यू हा हार्ट अॅटकने झाला. मात्र सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या झाली ती केवळ ते दलित असल्यानेच करण्यात आली असा आरोप यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर केला.
काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यातील हे भेटीचे राजकारण होत असल्याबद्दल विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, यात कसली आलीय राजनीती हे संपूर्ण प्रकरण न्यायाचे आहे. सोमनाथ सुर्यवंशी हा राज्यघटनेच्या रक्षणाचे काम करत होता. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली. तसेच ही लढाई दोन विचारांची आहे. एकाबाजूला राज्यघटनेची तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची विचार धारा, सोमनाथच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची विचारधारा कारणीभूत असल्याचा आरोप करत या प्रकरणी तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.