Breaking News

नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाही व्यवस्था नाही तर…परंपरा ६० हजार कामगारांना रोजगार दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर होतात. आज तो क्षण आहे. आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. याच काळात आपल्याला आपली नवी संसद मिळाली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. आज सकाळी संसद भवन परिसरात सर्व पंथांच्या प्रार्थना झाल्या आहे. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारं मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारी कडी सिद्ध होईल.

पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले, नवीन संसद भवन आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संकल्पना साकार करत आहे. ही नवी संसद आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाची साक्षीदार होईल. विकसित भारताच्या संकल्पांची सिद्धी होताना पाहील. नूतन आणि पुरातनाच्या सहअस्तित्वाचा आदर्श बनेल. भारत जेव्हा विकास करतो, पुढे जातो, तेव्हा हे विश्वदेखील पुढे सरकतं.

संसद भवनाने सुमारे ६०,००० कामगारांना रोजगार दिला आहे. त्यांच्या श्रमाला समर्पित डिजिटल गॅलरीही तयार करण्यात आली आहे. आपण लोकसभा आणि राज्यसभा पाहून आनंद साजरा करत आहोत, परंतु आपण देशात ३०,००० हून अधिक नवीन पंचायत इमारती देखील बांधल्या आहेत. पंचायत भवन ते संसद भवनापर्यंत आमची निष्ठा सारखीच आहे.

जुनी संसद असतानाही नव्या संसद भवनाची गरज काय, असा प्रश्नही विरोधकांसह जनतेकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संसदेच्या जुन्या भवनात सगळ्यांसाठी आपली कामं पूर्ण करणं फार कठीण होतं. तंत्रज्ञान, बसण्याच्या जागा यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही चर्चा सातत्याने होत होती की देशाला नव्या संसद भवनाची गरज आहे. येत्या काळात खासदारांची संख्या वाढली असती. मग ते कुठे बसले असते? त्यामुळेच ही काळाची गरज होती की संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम केलं जावं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, उद्घाटनाच्या दुसऱ्या टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नव्या संसद भवनातून संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

मला आनंद आहे की ही नवी इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. या वेळेलाही या सभागृहात सूर्याचा प्रकाश थेट येत आहे. वीजेचा अत्यल्प वापर व्हावा याचीही काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी आधुनिक उपकरणे आहेत, याची परिपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. आज सकाळीच संसद भवनाला भेटणाऱ्या कामगारांच्या एका तुकडीला भेटलो. या संसदेत ६० हजार कामगारांना रोजगार देण्याचं काम केलं आहे. त्यांनी या नव्या इमारतीसाठी आपला घाम गाळला आहे. त्यांच्या श्रमाला समर्पित एक डिजिटल गॅलरीही बनवण्यात आली आहे. संसदेच्या निर्माणात त्यांचं योगदानही अमर झाले आहे, असंही म्हणाले.

भारत फक्त लोकशाहीचा देश नव्हे तर लोकशाहीची जननीसुद्धा आहे. लोकशाहीची आई आहे. जागतिक लोकशाहीचा भारत एक मोठा आधार आहे. लोकशाही आपल्यासाठी फक्त एक व्यवस्था नाही, तर एक संस्कार आहे. एक विचार आहे, एक परंपरा आहे, असंही मोदी म्हणाले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *