एकनाथ शिंदे आजही पंतप्रधान आणि अमित शाह यांचे लाडकेच आहेत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा आपलेपणाची वागणूक दिलीय. अमित शाहनींही भावासारखे त्यांच्यावर प्रेम केलेय. सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका असल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचेही भावासारखे प्रेम आणि आपुलकी शिंदेंविषयी राहील असे वक्तव्य भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना केले.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर म्हणाले की,संजय राऊतांच्या अशा प्रकारच्या बोलण्याने त्यांच्या पक्षाचा जो काही ऱ्हास झालाय त्याला कारणीभूत आहेत. पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वाला मातीमोल करण्याचा विचार त्यांचा दिसतोय. एकनाथ शिंदे क्षमतावान नेते आहेत. त्यांनी शिवसेनेत असताना स्वतःचे कर्तृत्व दाखवले. उद्धव ठाकरे जरी पक्षप्रमुख असले तरी ते अक्खा पक्ष सांभाळत होते. ते मेहेरबानीवर जगणारे नाही धाडसी नेते आहेत. बाळासाहेबांच्या विचारांकरिता एक वैचारिक बंड त्यांनी उभारले आणि स्वकर्तृत्वावर राज्याचे नेतृत्व केले, अशा शब्दांत दरेकरांनी राऊत यांना सुनावले.
पत्रकारांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी विविध राजकीय घडामोडिंवर भाष्य केले. संजय शिरसाट यांच्या विधानावर दरेकर म्हणाले की, महायुतीत विसंवाद होणार नाही यांची काळजी सर्वच नेत्यांनी घेतली पाहिजे. विश्रांती घेण्यासाठी एकनाथ शिंदे दरे गावी नेहमीच जात असतात. याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीत काढणं हे योग्य नाही. त्यांनी प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा विचार केला. महायुती अभेद्य कशी राहील, समन्वय कसा राहील याचा विचार केला. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी तो महायुतीच्या, महाराष्ट्राच्या हिताचाच असेल यावर आमचा विश्वास असल्याचे सांगितले.
ईव्हीएमबाबत विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, हा रडीचा डाव आहे. आपण जिंकलो तर ईव्हीएम चांगले, कर्नाटक, झारखंडला जिंकलो तिथे ईव्हीएम चांगले. लोकसभेला यश मिळाले तेव्हा ईव्हीएमची बोंबाबोंब केली नाही. आता आपल्या पदरी दारुण अपयश आले म्हणून ईव्हीएमवर दोष देणे योग्य नाही. ईव्हीएमवर दोष असेल तर तुमचे निवडून आलेले आमदार राजीनामा देणार आहेत का? मग बॅलेट पेपरची मागणी करा. शरद पवार अतिशय धूर्त आहेत. त्यांचे आमदार त्यांच्याकडे टिकतील की नाही अशी भीती त्यांना झालीय. त्यांचे सगळे आमदार अजित पवार आणि आमच्याकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. मग ईव्हीएमच्या आधारे चौकशी लावू असे आमदारांना दाखवून टिकवून ठेवण्याचा पवारांचा केविलवाणा प्रयत्न आहे.
मंत्रिपदाच्या तयारीबाबत प्रविण दरेकरांना विचारले असता ते म्हणाले की, कुणाची इच्छा नसते की अशा प्रकारची जबाबदारी मिळावी.परंतु इच्छेपेक्षा आमचा पक्ष ठरवत असतो कुणाची क्षमता आहे, कोण महाराष्ट्रातील जनतेला न्याय देऊ शकतो आणि पक्षाची सद्यस्थितीची गरज काय आहे. अशा अनेक प्रकारचे निकष लावून आमचा पक्ष, नेतृत्व निर्णय घेत असतो. कुणाच्या इच्छेवर भाजपात पदं मिळत नसतात. कर्तृत्वावर, क्षमतेवर आणि पक्ष निर्णयावर या गोष्टी होत असतात. तसेच एकनाथ शिंदे यांनी कुणाला मंत्री करायचे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. सूत्रांपेक्षा त्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात तो महत्वाचा आहे. कोण मंत्री असावा हा सर्वस्वी अधिकार शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा आहे.
गृहमंत्री पद मिळाल्यावरच शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील या चर्चेवर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, यासंदर्भात आमचे केंद्रातील नेते अमित शहा यांची तिन्ही पक्षाच्या नेत्यांशी तपशीलवार चर्चा झालीय. त्यांनी याबाबत दिशानिर्देश दिलेला असावा. खतेवाटपाच्या चर्चा माध्यमांसमोर येऊन बोलून होत नसतात. चार भिंतीत तिन्ही पक्ष आणि आमचे दिल्लीतील नेतृत्व बसून ठरवत असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच निर्णय होतील.
शेवटी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, तसेच कुठल्याही पदासाठी रस्सीखेच नाही. आम्ही हे राज्य चालवत असताना महायुती म्हणून चालवणार आहोत. महायुतीतील प्रत्येक पक्ष हा एक नंबर, दोन नंबर आहे. राज्यातील जनतेने महायुती म्हणून बहुमत दिलेय. आमच्या तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या नंबरवर चर्चा न करता राज्यातील जनतेला एकत्रितपणे न्याय द्यायची भूमिका आमची आहे. आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व एकवाक्यतेने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करू.