Breaking News

टीका करण्यापेक्षा पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडा प्रविण दरेकर यांचा नवाब मलिकांना टोला

मुंबई: प्रतिनिधी

मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांवर टीका केली. या टीकेवरून भाजपा नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला.

राज्यपालांनी जिल्ह्यांचे दौरे केले तर यात काय गैर आहे?  त्यांच्या दौऱ्यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही. दौऱ्यावर राजकीय टीका करण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या, त्वरित नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या, असा उपरोधिक टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांना लगावला.

घटनेच्या तरतुदीप्रमाणे राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे मुख्यमंत्री नाहीत तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यापेक्षा उच्च पदावर आहेत. राज्यपाल अधिकाराच्या किंवा घटनेच्या चौकटीत राहून कुठे भेट देतात, हे बहुधा नवाब मलिकांना माहीत नसावे ,अशी उपरोधिक टीकाही केली.

राज्यपाल नांदेडमधील विद्यापीठाच्या कार्यक्रमाला गेले होते. नांदेड येथील विद्यापीठ असो किंवा कोणतेही विद्यापीठ, ते विद्यपीठाचे कुलपती आहेत. त्यामुळे विद्यापीठात जाणे, वा विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे यात अजिबात गैर नाही. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून काळजी घेत दौरे केले, राज्याचा आढावा घेतला तर यामध्ये राजकीय वक्तव्य करण्याची आवश्यकता नसून पूर परिस्थितीचा विचार करावा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.

पंतप्रधान भेटीकरीता लायकी व क्षमता पाहिली जाते

 पंतप्रधान भेटीकरता लायकी आणि क्षमता बघून भेट ठरत असते. यात संजय राऊत बसतात की नाही हे मला माहीत नाही, असा खोचक टोला त्यांनी राऊतांना लगावला

पंतप्रधानांनी आम्हाला चहा प्यायला बोलवायला पाहिजे होते. पण ते आम्हाला पाणीसुद्धा विचारत नाहीत, असे संजय राऊत बोलले. माध्यमासोबत यावर बोलताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान हे आपल्या देशाचे सर्वोच्चपदी असणारे पद आहे. त्यामुळे पंतप्रधान भेटीकरता नियमावलीचे पालन केले जाते. पंतप्रधानांना कोणालाही भेटता येत नसून समोरच्याची लायकी आणि क्षमता बघून भेट ठरत असते, अशी टीकाही त्यांनी केली.

Check Also

अखेर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अधिकार मंत्रिमंडळाकडेच मंत्रिस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत

अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच …

Leave a Reply

Your email address will not be published.