Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, संविधानाची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा: अन्यथा… कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे डॉ प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या २४ तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे.

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहनही एका प्रसिद्धी प्रत्रकान्वये आंबेडकरी समाजाला केले.

दरम्यान काल मंगळवारी रात्री परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना घडल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर परभणी येथील दलित समाजाने आज परभणी बंदची घोषणा दिली. मात्र या बंदला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

दुपारपासून दलित समाजाने या विटंबनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र तेथील सुरक्षेच्या कारणास्तव असलेल्या पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या पोलिसांशी हुज्जत घालत गेट उघडण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी गेटच उघडले नाही.

या विटंबनेच्या निषेधार्ध आक्रमक आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनावर आणि शहरातील दुकानांवर दगडफेक केली. तर काही ठिकाणी टायर, दुकानाच्या बाहेर असलेले पाईपला आगी लावण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा लागला. तर पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा सुरु केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *