Breaking News

निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणेः प्रतिनिधी
लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असे संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल असे जाहीर केले.
चंद्रकांत पाटील सोमवारी पुण्यात पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य नेणारे वाहन रवाना केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
सरकार किती दिवस व्यापार बंद ठेवणार आणि जनजीवनही बंद ठेवणार आहे ? दारुची दुकाने चालू ठेवायची आणि कपड्यांच्या आणि किराणा दुकानांवर निर्बंध लादायचे याला अर्थ नाही. आर्थिक व्यवहार बंद राहिले तर लोकांना जगणे अवघड होईल. दुकाने पुन्हा एकदा नियमितपणे सुरू झाली पाहिजेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे. गरज पडल्यास आपण स्वतः व्यापाऱ्यांचे नेतृत्व करू असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाच्या आमदारांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड येथील महानगरपालिकांच्या भाजपा नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांसाठी मदत करतील. पूरग्रस्तांसाठी कोणते मदत साहित्य पाठवायचे याची यादी पक्षातर्फे कार्यकर्त्यांना पाठवली आहे व त्यानुसार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत सुरू केली आहे. पुण्यातून आतापर्यंत मदत साहित्याचे अठरा ट्रक – टेंपो पूरग्रस्त भागात रवाना झाले आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी मुंबईतून मदत पाठवली आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांकडील सर्व काही उद्धवस्त झाले असल्याने सरकारने त्यांना तातडीने मदत केली पाहिजे. २०१९ साली कोल्हापूर – सांगलीमध्ये पूर आला असताना देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने लोकांना तातडीची मदत केली होती त्या पद्धतीने ठाकरे सरकारने आता लोकांना मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पुण्यातील मेट्रोची परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. केंद्र सरकारचा या प्रकल्पात सर्वात मोठा आर्थिक वाटा आहे. या प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या आणि पायाभूत काम देवेंद्र फडणवीस सरकारने केले. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रोची चाचणी घाईघाईत उरकण्यात आल्याबद्दल त्यांनी मेट्रो कंपनीचा निषेध केला. भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारने सर्व काम केले असताना आता कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न इतरांनी केला तरी लोक फसणार नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरायचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले होते, पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. खोटे बोलायचे आणि वेळ मारून न्यायची अशी महाराष्ट्र विकास आघाडीची पद्धती आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, शेतकरी कर्जमाफी अशा सर्व बाबतीत आघाडी सरकारने खोटारडेपणा केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

Check Also

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही तर… राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना भविष्यकालीन योजनांचा सुतोवाच

पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले. राजभवन …

Leave a Reply

Your email address will not be published.