Breaking News

आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या संजय राऊतांच्या विरोधातही गुन्हा दाखल करा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम

मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही वाभाडे काढतोय. म्हणूनच विरोधकांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सूडभावनेने कृती करण्याचा त्यांचा डाव आहे. आशिष शेलार यांना एक न्याय व संजय राऊत यांना काय बोलण्याचे फ्री लायसन्स दिले आहे का? कायद्यासमोर सगळे समान आहेत, त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

प्रविण दरेकर यांच्यासह आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आज सकाळी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात उपस्थित होते. आशिष शेलार यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात भाजपाचे नेते पोलिस ठाण्यात उपस्थित होते. यावेळी आशिष शेलारही उपस्थित होते.

आज लोकांचे अनेक प्रश्न आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत राज्याचा विकास पूर्णपणे ठप्प आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढतोय. कोरोनाच्या नावाखाली राज्य २५ वर्षे मागे गेले. पण आम्ही जर त्यांचे दोष दाखवले, त्यांच्यावर टीका केली, तर अशा प्रकारचा इश्यू करायचा व आमच्यावर गुन्हे दाखल करायचे, असे हिटलरशाही पद्धतीचे काम महाविकास आघाडी सरकारचे सुरू आहे. पण आम्ही याची पर्वा करत नाही. अशा संघर्षाला आम्ही तयार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.

यशवंत जाधव यांच्यासाठी वेगळा न्याय, राऊत यांच्यासाठी वेगळा न्याय आणि विरोधी पक्षासाठी वेगळा न्याय. कायद्यासमोर सगळे समान आहेत. म्हणून अशा प्रकारे सूडबुद्धीने केलेली कारवाई आम्ही सहन करणार नाही. टोकाचा संघर्ष करावा लागला तरी भाजपा तो करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी आज अत्यंत वाईट व आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. मग त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह नाही का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. आशिष शेलार जे आक्षेपार्ह बोललेच नाही, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधून दबाव आणायचा, पोलिसांची इच्छा नसतानाही गुन्हा दखल करायला लावण्याचा प्रकार चुकीचा आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *