Breaking News

बॉम्बस्फोटातील हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडले

मुंबईत घडविलेल्या बॉम्बस्फोटातील हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटात चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आरोपीसोबत जमीन खरेदी प्रकरणात आर्थिक व्यवहार करून जेलमध्ये गेलेले महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून भाजपाने आज मुंबईत शक्तिप्रदर्शन केले. मोर्चा सुरु होण्यापूर्वी आझाद मैदानात भाजपाच्या नेत्यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

आझाद मैदाना ते मेट्रो सिनेमा असा भाजपाने मोर्चा काढला. परंतु पोलिसांनी भाजपाला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन यलोगेट पोलीस ठाण्यात नेले आणि काही वेळानंतर सोडून दिले.

आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा निघालेला असताना पोलिसांनी फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, किरीट सोमय्या,मंगलप्रभात लोढा, नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हा संघर्ष देशद्रोह्यां विरोधात आहे. दाऊदच्या विरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही मागणी आमची केवळ राजकीय मागणी नाही. रोज घटना घडत आहेत, पण रोज आम्ही राजीनामा मागत नाही. पण ही घटना बघितली तर लाजिरवाणी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी शहावली खान याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला, बॉम्बस्फोट कसा घडवायचा, स्कूटरमध्ये ठेवून बॉम्बस्फोट केले. दुसरा सलीम पटेल दाऊदची बहिण हसिना पारकर या दोघांनी मिळून हे कुंभाड रचले. या हरामखोरांनी जमीन विकली, कोणाला विकली नवाब मलिकांना. मुंबईत उकिरड्याची जागाही २५ रुपये चौरस फुटाने मिळत नाही. या हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही असा सवाल त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवा- आशिष शेलार

विरोधकांना नामोहरम करण्याचा कट कसा रचला जातोय हे उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली.

‘हा महाभयंकर कट असून विरोधी पक्षनेते ‘देवेंद्र फडणीस यांनी सादर केलेल्या पुराव्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर, पोलीस यंत्रणाचा गैरवापर या सर्व बाबींचे धागे-दोरे एकमेकांशी गुंतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा कट देखील उलगडला आहे. एकूण पाहता हा महाभयंकर कट दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारी वकिलांची देखील सुरक्षा वाढवावी

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाबद्दल होते. त्या कटाचा मास्टर माईंड विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रविण चव्हाण आहेत. त्यामुळे विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्याशी कोणाच्या गाठीभेटी होत आहेत. कोण व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अथवा घरी जात आहेत. यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या गटाचे मास्टरमाइंड चव्हाण असल्याने त्यांचीही सुरक्षा महत्त्वाची असून राज्य सरकारने विशेष सरकारी वकील यांनादेखील अधिक सुरक्षा पुरवावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

अजून पुढचे बरेच अंक बाकी

लावं रे तो व्हिडीओ काय असतो ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दाखवून दिले! सरकारच्या भयंकर कटाचे वगनाट्य उघड करुन ठाकरे सरकारचे त्यांनी “वस्त्रहरण” केले. या नाटकातील “तात्या सरपंच” कोण? मंजुळाबाई कोण? गोप्या कोण? मास्तर कोण?

अजून पुढचे बरेच अंक बाकी आहेत, असे खोचक ट्विट करुन आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवळ टीका केली.

Check Also

आता आमशा पाडवी यांचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात डेरे दाखल

नंदूरबार मधील शिवसेना वाढीच्या महत्वपूर्व योगदान राहिलेल्या आमशा पाडवी आणि जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे दुर्लक्षित राहिलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *