राज्य विधिमंडऴाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सध्या सभागृहात चर्चा सुरु आहे. राज्यातील लोक कलावंताना कोरोना काळात करण्यात आलेल्या मदतीच्या अनुषंगाने पुकारण्यात आलेल्या लक्षवेधीवरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले असून कोरोना गेल्याचे वक्तव्य केले.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर लक्षवेधी पुकारण्यात आली. त्यावेळी शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी राज्यातील लोक कलावंताना राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी केली.
त्यावर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी ५६ हजार लोक कलावंत आणि ५०० हून अधिक कलावंत समुहाला कोरोना काळात ४० कोटी रूपयांची मदत करण्यात आल्याचे सांगितले.
त्यावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर उपप्रश्न उपस्थित करत राज्यपालांच्या भाषणात लोक कलावंताना ३५ कोटी दिल्याचा उल्लेख आहे, छापील उत्तरात ३४ कोटी आणि तोंडी उत्तरात ४० कोटी रूपये यातील नेमके किती लोक कलावंताना पैसे दिले असा सवाल करत फक्त १०० कलावंतानाच मदत का, त्यापेक्षा जास्त जणांना का नाही, तुरंगातल्या कैद्यांवर २२८० रूपये आपण खर्च करतो आणि कलावंताना मात्र २ हजार २२० इतके कमी कसे खर्च करतो असा सवालही त्यांनी यावेळी केला.
यावर अमित देशमुख म्हणाले की, लोक कलावंताना मदत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत आहे. ती आकडेवारी गोळा झाली की त्याबद्दलची माहिती देतो. तसेच १०० पेक्षा जास्त लोक कलावंताना मदत देण्याबाबतचा मुद्दा योग्य आहे. त्याबाबतचा निर्णय विचार करून घेणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना म्हणाले की, कलावंताना खरे तर कोरोना काळातच मदत करायला हवी होती. पण आता कोरोना गेला आणि मास्कही कोणी घालत नाही असे सांगत लोक कलावंताना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली.
यावेळी सभागृहातील एकाही आमदाराने मास्क घातला नव्हता की कोविड प्रोटोकॉलचे पालन केल्याचे दिसून येत नव्हते. विशेष म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृतरित्या कोरोना गेल्याची घोषणा केलेली नसताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्याने त्यास मोठे महत्व आले आहे.
