Breaking News

फडणवीस म्हणाले, … काँग्रेस नेत्यांनी निर्लज्जतेचा कळस गाठलाय पंजाबमधील घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी करत त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बेशर्मपणे प्रतिक्रिया व्यक्त करत निर्लज्जतेचा कळस गाठला असल्याची टीका केली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपाच्या स्वस्थ बालक अभियानाच्या प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस खा. संध्या राय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, माजी मंत्री आ. आशीष शेलार, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी जे काही घडलं ते अत्यंत गंभीर होतं. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे. या घटनेची राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेतली पाहिजे. देशात वेगवेगळया पक्षांची, आघाड्यांची सरकारे आली होती. राज्यात आणि केंद्रात अनेकदा वेगवेगळया पक्षांची सरकारे देशाने पाहिली आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची स्पष्ट नियमावली आहे. या संदर्भात एसपीजीचा एक कायदा आहे. त्याची एक पुस्तिका आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी ही पुस्तिका राज्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून तयार होत असते. या पुस्तिकेप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करणे अपेक्षित असते. घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येईल की, पंतप्रधानांच्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी दिली गेली. आंदोलकांमुळे पद्धतशीरपणे रस्ता बंद होईल याची दक्षता घेतली गेली. जेथे हे घडलं तेथून पाकिस्तानची सीमा अतिशय जवळ आहे. पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात आणण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका ही देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट असते. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी अतिशय बेशमरमीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून निर्लज्जतेचा कळस गाठल्याची टीका फडणवीस यांनी करतपंतप्रधान हा देशाचा असतो, कोण्या एका पक्षाचा नसतो. एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होत नाहीत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. 

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *