Breaking News

अमोल मिटकरींच्या टीकेला उत्तर देताना शहाजी बापू म्हणाले, रोज नटून-थटून दाढीला… ते सोंगाड्या आहेत मात्र त्याचा काही उपयोग नाही

राज्यात एकीकडे सामाजिक आणि राजकीय नेत्यांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे राजकारण आणि राजकीय टोलेबाजी देखील दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’फेम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांना शिंदे गटातील जॉनी लिव्हर असल्याची खोचक टीका केली. मिटकरी यांच्या या टीकेला शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांनीही जशास तसे उत्तर देत परतफेड करण्याचा प्रयत्न केला. शहाजीबापूंच्या घरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर ते एका वृत्त वाहिनीशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, संजय राऊत हे तुरुंगात गेल्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी अमोल मिटकरी हे दररोज नटून-थटून दाढीला तेल लावून येत आहेत असा खोचक टोला लगावला.

अमोल मिटकरींच्या या टीकेवर शहाजीबापू पाटील बोलताना म्हणाले, अमोल मिटकरी हे राजकारणातले विचार करण्यासारखे पात्र नाहीत. आमच्याकडे एक नाऱ्या म्हणून सोंगाड्या होता. अमोल मिटकरी म्हणजे सोंगाड्या आहे. संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे त्यांची जागा आपल्याला मिळावी, म्हणून ते रोज टीव्हीवर नटून-थटून, दाढीला तेल लावून येत आहेत. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही ते म्हणाले.

मंगळवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या शहाजीबापू पाटील यांनी आपली तुफान टोलेबाजी करत थेट उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाच टोला लगावला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलो आहे. ते मला लक्ष्य करणार म्हणजे काय करणार? मी उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. त्यांनी तिथे राहावं. लोकांचं काम करावं आणि माझ्या मतदारसंघावर लक्ष ठेवावं, असा थेट हल्लाबोलच केला.

दरम्यान, अमोल मिटकरींनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शहाजीबापू पाटील यांच्यावर खोचक टिप्पणी केली होती. शहाजीबापू हे व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे गटातील जॉनी लिव्हर आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. शिंदे गटात त्यांचा कसा कार्यक्रम वाजला आहे, याची चिंता त्यांनी करावी. स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राची करमणूक करणारे नवे जॉनी लिव्हर आहेत, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी शहाजी पाटील यांच्यावर केली होती.

Check Also

अमोल मिटकरी आणि शहाजीबापू पाटील यांच्यात कलगीतूरा, बारकी पोरंही… टोला प्रति टोल्याने दोघांतील वादांत वाढतेय रंगत

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.