Breaking News

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथवून टाकल्यानंतर भाजपा नेत्यांकडून सातत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यातच गणेशोत्सवानिमित्त तर २४ तासाच भाजपाच्या तीन नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. यापार्श्वभूमीवर शिंदे-भाजपाबरोबर मनसेही भाजपाच्या महायुतीत सहभागी होणार का? अशी अटकळ बांधण्यात येत होती. तसेच मुंबई दौऱ्यावर येत असलेले भाजपा नेते अमित शाह हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे-अमित शाह भेट होणार की नाही याबाबत स्पष्टच भूमिका मांडली.

या सर्व घटनाक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत स्पष्ट संकेत देणारं विधान केलं आहे. त्यांनी प्रत्यक्षपणे अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात बैठक होणार नसल्याचे स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमित शाह मुंबईत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. ते यावेळी भाजपाच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचे कोणतेही कार्यक्रम नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

देवेंद्र फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, गणेशोत्सवा दरम्यान अमित शाह मुंबईत येत असतात. यावेळी ते मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर काही घरगुती गणपतींना भेट देणार आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आशिष शेलार यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. ते माझ्या घरीही येणार आहेत. याशिवाय ते मुंबईत येणार असल्याने त्यांनी मुंबईत भाजपा नेत्यांची एक बैठक घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. त्यासाठीही त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे. तसेच मुंबईत एका शाळेच्या उद्घाटनानिमित्ताने कार्यालयीन कामासाठी येणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नसल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र भाजपाकडून आतापर्यत धक्कातंत्राचा वापर करून राजकारण खेळण्यात येत असल्याने आज देवेंद्र फडणवीस राज ठाकरे-अमित शाह यांची कोणतीही भेट होणार नसल्याचे सांगत असले तरी उद्या अमित शाह आल्यानंतर ऐनवेळीही ही भेट होवू शकते अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *