पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे भाजपा स्थापना दिनानिमित्त ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉलचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉल महत्त्वपूर्ण ठरेल असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
चहा स्टॉल वितरण सोहळा दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात पार पडला. माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, मुंबई उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, सचिव प्रतिक करपे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. कोविड-१९ च्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉलच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत ५० शाखा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांनी सांगितले. यावेळी योगिता मोरे, माधुरी ठाणेकर, अमिता देवळेकर, संगीता पुसळकर, मालती मोरे, सुशील शिरोडकर यांना चहा स्टॉलचे वितरण करण्यात आले.
मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करणार- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गर्जना
राज्यापुढे घराणेशाहीचे मोठे संकट उभे राहिलेय. पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याने पक्ष चालविणे लोकशाहीला धोकादायक आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असून येणाऱ्या काळात मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्याकरिता आणि प्रायव्हेट लिमिटेड पक्षाला हटविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवारी बोलत होते. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयातील सभागृहात भव्य कार्यक्रम पार पडला. माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजप प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार कालिदास कोळंबकर, कॅप्टन आर तमिळ सेल्वन, मुंबई उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, सचिव प्रतिक कर्पे, भाजपा दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइनद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले.
विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पार्टी लोकांची सेवा करत विस्तारत जाणारा पक्ष आहे. मुळातच पक्षाची निर्मिती राष्ट्रवादातून झाली आहे. भाजपा संघर्ष करत जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अनेकवेळा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला पण विचार संपला नाही. पक्षाकडे दोन जागा असताना घाबरलो नाही. आतातर ३०२ जागा आहेत असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. भारतीय जनता पक्ष समतेचा संदेश देत गरिबाच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष असल्याचे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे आमचं लक्ष्य आहे. केवळ सेक्युलरच्या नावाखाली विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करण्यापेक्षा देशातील गरिबांना सेवा देण्याचे काम भाजपा करत आहे. येणाऱ्या काळात शोषित आणि वंचितांसाठी विकासकामांच्या योजना आणून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. राज्यातील सध्याची परिस्थिती भयानक आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास जेलमध्ये डांबले जाते. घरे तोडली जातात. संस्कृती पायदळी तुडवली जातेय. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. यापुढे महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईतील परिस्थिती विदारक असून मुंबई महापालिकेने कोविड काळात प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला. खऱ्या अर्थाने प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे काय ते महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड केले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यानी त्यावर चकार शब्द उच्चारला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळातील घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष करावा लागणार आहे असे सांगत मुंबई महानगरपालिकेतील घराणेशाहीचा पराभव ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
