काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोट निवडणूकीतील कामगिरीवर चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य ठरणार असले तरी आता काहीही करून ही जागा निवडूण आणायचीच असा चंग चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी भाजपा उमेदवार सत्यजीत कदम यांना निवडूण द्या असे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आज प्रचारात आघाडी घेत घरोघरी जाऊन भेटीगाठीसह भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मतदानासाठी आवाहन केले.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचाराचा जोर वाढत आहे. भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या सह भाजपाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करताना दिसत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी पेठेतील विविध मान्यवरांच्या घरी भेट देऊन, भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मतदानासह भाजपा व मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
शिवाजी पेठेतील शहीद जवान अभिजीत सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन अभिजीतजींच्या स्मृतीस अभिवादन केले, तसेच सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधला. त्याचबरोबर ब्रम्हभूती श्री सद्गुरू रामचंद्र महाराज यादव यांच्या मठात जाऊन दर्शन घेतले, आणि ह. भ. प. महादेव महाराज यादव यांचे आशीर्वाद घेतले. तसेच हिंद केसरी तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित पैलवान विनोद चौगुले यांची सदिच्छा भेट घेऊन भाजपाच्या विजयासाठी आवाहन केले.
त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव, कॉम्रेड चंद्रकांत यादव, यशवंत सहकारी बँकेचे संचालक अॅड प्रकाश देसाई, उद्योजक अभय देशपांडे, मराठा मावळा संघटनेचे आनंदराव जरग, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सरनाईक, प्रकाश सरनाईक, संग्राम जरग, विलास पाटील, यांच्या सह अनेकांच्या घरी जाऊन भाजपासाठी मतदानाचे आवाहन केले.
