Breaking News

फडणवीसांच्या टीकेवर शरद पवार म्हणाले, प्रश्नाचे गांभीर्य नसणाऱ्याचं फारस गंभीर… मुंबईतल्या १३ व्या बाँम्बस्फोटावरून पवारांनी दिले उत्तर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जाती-पातीतील संघर्ष निर्माण झाला असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन आणि मतांचे राजकारण करण्यावरून भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या एकूण धार्मिक राजकारणाचा पडदा पाश करण्यासाठी सलग १४ ट्विट करत मुस्लिमधार्जिणे राजकारण पवार करत असल्याचा आरोप केला. विशेषत: मुंबईत १२ बॉम्बस्फोट झालेले असताना मुस्लिम समुदायाांना वाचविण्यासाठी पवारांनी १३ वा बॉम्बस्फोटाचा शोध लावल्याचा आरोप पवारांवर फ़डणवीसांनी केला. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, ज्यांना तारतम्य कळत नाही, ज्यांना प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही, त्यांनी काही विधानं केली असतील, तर त्याची फारशी नोंद घेण्याचं कारण नसल्याचे सांगत फडणवीसांच्या आरोपांना आपण फारसं गांभीर्याने घेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या जळगांवच्या दौऱ्यावर आहेत. तेथील दोन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मात्र देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आकडेवारी खरी असल्याचे शरद पवार यांनी सांगत ते पुढे म्हणाले की, मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना १३ ठिकाणी झाल्याचं मी सांगितल्याचं ते म्हणाले. मुस्लीम भागाचं नाव घेतल्याचंही सांगितलं. ते १०० टक्के खरं आहे. हे मी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

१२ ऐवजी मुस्लीम भागात १३वा स्फोट झाल्याचं आपण का सांगितलं याचं कारण देखील होतं. ज्या १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ती हिंदुंची ठिकाणं होती. हा स्फोट कुणी केला? त्याचा शोध मी घेतला. त्यासाठी जे साहित्य वापरलं, ते मी स्वत: जाऊन बघितलं. जो पहिला बॉम्बस्फोट झाला, त्याचे साहित्य मी पाहिलं. ते हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीत तयार होतं हे मला माहिती होतं. याचा अर्थ त्यामागे बाहेरची शक्ती होती. त्यामुळे कुणीतरी शेजारचा देश हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद वाढवायचं काम आणि मुंबईत आग लागावी अशा प्रयत्नात होता. स्थानिक मुस्लीम त्यात नव्हते. पण मी बारावं ठिकाण मोहम्मद अली रोड सांगितल्यामुळे जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती, त्या दंगली झाल्या नाहीत अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

हिंदू-मुस्लीम दोघेही एकत्र आले आणि या परकीय शक्तीच्या विरुद्ध आपण उभं राहावं या मताशी आले. त्यावेळी चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. त्यांच्याकडून मला समन्स आले. मला विचारलं की तुम्ही असं का म्हणाले? मी म्हटलं हे ऐक्य राहावं म्हणून बोललो. त्यांच्या अहवालात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की पवारांनी अशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईत आग लागली असती. त्यामुळे त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता. पण हे तारतम्य ज्यांना कळत नाही, ज्यांना प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही, त्यांनी काही विधानं केली असतील, तर त्याची फारशी नोंद घेण्याचं कारण नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *