Breaking News

शरद पवार म्हणाले, केंद्रात कोणताही प्रश्न आला तर महाराष्ट्रासाठी एकच व्यक्ती म्हणजे… दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री

सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

साखर कारखानदारीसाठी राज्य सरकारची मदत हवीच असते. सुदैवाने आत्ताच्या राज्य सरकारमध्ये ऊसाबद्दल, कारखानदारीबद्दल जाण असणारे अनेक सहकारी आहेत. त्यामुळे त्यांचीही मदत होईल. आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील ऊसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहे याचा मला मनापासून आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

भविष्यात ऊसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. ऊस तोडणी आणि वाहतूकीचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशात कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती कमी होत आहे. याचा परिणाम उद्योग आणि शेतीवर होत आहे. ऊसाच्या बगॅसच्या माध्यमातून ३ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये २४७० मेगावॅट स्थापित क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यापैकी आपण ६५ ते ७० टक्के वीज महावितरणला दिली तरी अंदाजे १६६० मेगावॅट वीज राज्य सरकारला मिळू शकते. यासाठी बगॅस आधारीत प्रकल्पाच्या उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्याचसोबत सौर ऊर्जेचा उपयोग करणेही आवश्यक आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी भरपूर वाव आहे,मात्र त्यासाठी निधीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन इथेनॉल साठवणूकीची क्षमता वाढविणे आणि त्यासाठी गुंतवणूक, रेल्वेने वाहतूक करण्याची योजना आणि  इथेनॉल खरेदी याबाबत तेल कंपन्यांचे धोरण अधिक अनुकूल होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

साखर उद्योगासमोर असलेले प्रश्न अनेक आहेत,  या प्रश्नांवर चर्चा करून विधायक, अनुकूल, शाश्वत आणि पर्यावरण पूरक उपाययोजना हाती घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काळ सुसंगत असे सर्वस्पर्शी व्यापक सूक्ष्मनियोजन महत्वाचे आहे. दूरगामी दृष्टी, दृढनिश्चयी धोरणात्मक संकल्प आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना या त्रिसुत्रीच्या बळावर साखर उद्योगाला चांगली दिशा देण्यासाठी साखर परिषद महत्वाचे योगदान देईल, असे त्यांनी सांगितले.

व्हीएसआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले बेणे-सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

प्रास्ताविकात सहकारमंत्री पाटील म्हणाले, राज्यात यावर्षी ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन वाढताना साखरेचा उताराही वाढला आहे. साखर उद्योगातून ६ हजार कोटीपेक्षा जास्त महसूल मिळतो. हा उद्योग वाढण्यासाठी ऊसाचे उत्पादन वाढविण्यासोबत चांगला उतारा असणे गरजेचे आहे. व्हीएसआयच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगले बेणे देण्याचा प्रयत्न आहे. आता साखरेसोबत इथेनॉलचे उत्पादन वाढायला हवे. यावर्षी 8 कारखाने चालवायला घेतले. त्यात २६ लाख टन ऊसाचे गाळप झाले. त्या परिसारातील जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

महासंघाचे अध्यक्ष दांडेगावकर म्हणाले, साखर कारखानदारीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा करण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी साखर उत्पादनात विक्रम करण्यात आला असून महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उद्योग ऊर्जेच्या क्षेत्राकडे वळल्यास सर्व घटकांना  लाभ होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार पवार यांच्याहस्ते ‘राज्यस्तरीय साखर परिषद- २०२२’  पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *