काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीचे छापे पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊदशी संबधित प्रकरणात ईडीने थेट कारवाई करत अटक केली. त्यास महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच नुकतेच शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींची मालमत्ताही जप्त करण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या संसदेतील दालनात भेट घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
त्याचबरोबर कालच महाविकास आघाडीच्या सर्व आमदार आणि खासदारांसाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ही उपस्थित होते. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे ही उपस्थित होते. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली हे महत्वाचे.
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील भेटीवरून भाजपा नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक भेट ही काही राजकिय कारणासाठी असतेच असे नाही तर ती भेट कदाचित संसदेतल्या एखाद्या प्रश्नासंबधीही असू शकते. मात्र त्याबद्दलची माहिती घेतल्यानंतर याबाबत सविस्तर बोलेन असा खुलासाही केला.
दरम्यान भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोदी-पवार भेटीबाबत बोलताना आमची भांडणे ही शिवसेनेशी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही नसल्याचे सांगत कदाचीत आगामी राजकीय गणितांच्या पार्श्वभूमीवर ही राजकिय भेट असल्याची शक्यता व्यक्त केली.
मात्र भेटीबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती बाहेर आलेली नसल्याने या भेटीतील संभावित चर्चेवरून अनेक अटकळे बांधली जात आहेत. तर काही जण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जुलै महिन्यात कार्यकाळ संपत आल्याने जुलै महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सुतोवाच व्यक्त करण्यात आहे.
दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून या भेटीबाबतचा अधिकृत खुलासा कोणताही आलेला नाही. त्यामुळे या भेटीवरून राज्यात भाजपाच्या नेत्यांवकडून मोठे पतंग उठविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
