काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपावर सूड उगविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहमंत्री पद हवे आहे तशी शिवसेनेच्या काही आमदारांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कारभारावरून नाराजी व्यक्त करत टीका केली.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृह खाते शिवसेनेला देण्यात येणार असल्याच्या चर्चेने मुळ धरले. त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही यासंदर्भात असे काहीही होणार नसल्याचे स्पष्ट करत गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर दिवस अखेर संजय राऊत यांनीही गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्यावर दिवसभरात करण्यात आलेल्या टीकेचा विषय संपला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा विषय तात्पुरता संपला असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्रिमंडळातील फेरबदल आणि खात्यांच्या आदला-बदलीबाबत मोठे वक्तव्य केले.
शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील खात्यांमध्ये अदला-बदल होणार नाही. पण राष्ट्रवादीच्या ज्या जागा खाली आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलून निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.
त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही खाते बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन मंत्री ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात गेल्याने सध्या असलेल्या इतर मंत्र्यांकडे त्यांच्या खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे खाती जास्त आणि माणसे कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून एखाद्या नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
