Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, हे शिंदेसरकार ‘फक्त घोषणा सरकार’ मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण करतेय

शिंदेसरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले…दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र अद्याप मदत मिळालेली नाही… ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडे दुर्लक्ष केले… हे शिंदेसरकार फक्त घोषणा सरकार आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत आज केली.

राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर बगल देण्याचे काम होत असून शिंदे सरकारमध्ये मंत्र्यांची कमतरता, पालकमंत्र्यांची न झालेली नेमणूक व कॅबिनेटचा रखडलेला विस्तार हे सगळे विषय पडून असून त्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे असा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने ईडी सरकार व मोदी सरकारविरोधात आंदोलने करत आहे. बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यात पाहिला तर ८.३ टक्क्यावर पोचला आहे. महागाई व बेरोजगारीवर मोदीसरकार बोलताना दिसत नाही. बेरोजगारी व महागाईने एवढा उच्चांक गाठला आहे की मोदी सरकार अक्षरशः अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या अजित पवार यांनी राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे वित्तीय तूट ३ टक्क्यापेक्षा कमी ठेवण्यात यश आले. त्यामुळे कॅगच्या अहवालात त्यांचे कौतुक करण्यात आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपा जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण कशी होईल हा प्रयत्न करत आहे. ३० जुलै २०१५ मध्ये नागपूरमध्ये याकूब मेमनला फाशी देण्यात आले. त्यावेळी कुणाचे सरकार होते. याकूब मेमन याचे शव कुणाच्या सरकारने नातेवाईकांना दिले हे सांगण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

भाजपा खोटेनाटे आरोप करुन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र करत आहे. याकुब मेमनप्रकरणी भाजप उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव वापरत आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून भाजपा आमदार राम कदम यांनी जाणीवपूर्वक जुना फोटो ट्वीट केला आहे हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *