Breaking News

जयंत पाटील यांचा खोचक टोला, जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून शिंदे गटावर खरमरीत टीका

गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले, ज्याअर्थी मंत्रिमंडळ विस्तार करत नाही, त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जीवाभावाची शिवसेना सोडून गेले असल्याने तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही. त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात पूरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्हया- जिल्हयात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे. राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पूरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्या भागात पालकमंत्री नाहीत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने फक्त दोन मंत्री आहेत. परंतु गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात असल्याचा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शिंदे गटाला काही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले असा खोचक टोलाही बंडखोर आमदारांना त्यांनी लगावत शिंदे गटात जाण्याची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. कुणाला कशाची भीती आहे याची माहिती लोकांना आहे. तुम्ही जर गावखेड्यात गेलात तर लोक शिंदे गटाबाबत काय चर्चा करत आहेत याची कल्पना येईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

शिवसैनिकांनी कधीच निष्ठा बदलली नाही… निष्ठा न बदलणारा म्हणजेच शिवसैनिक. आजघडीला सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. काही लोक फक्त इकडे- तिकडे झाले आहेत. मात्र खरा शिवसैनिक अजून तळ ठोकून असल्याचे ते म्हणाले.

सोनिया गांधी यांच्या चौकशीत मानवतावादी दृष्टीकोन ठेवायला हवा
सध्या ईडी, सीबीआय, आयटी मार्फत चौकशी होणे हे नित्याचे झाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वय पाहता, प्रकृती पाहता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावून चौकशी करायला हवी होती. राजकारण होत राहील मात्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला पाहिजे असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षात कोणतीही गळती नाही
माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शासन आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे कामे घेऊन जात असतात. त्यात गैर काहीच नाही. आपल्या साखर कारखान्याच्या प्रश्नाविषयी बबन शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांना भेटले तशी त्यांनी पक्षाला कल्पनाही दिली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *