विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.
नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे – नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांच्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे असून यासंदर्भात राज्यपालांना स्मरण पत्र पाठविण्याचा महाविकास आघाडीचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अर्थसंकल्पिय अधिवेशनात उपस्थित करणार असून राजीनामा न घेतल्यास विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रसार माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
