Breaking News

वानखेडेने तर पंतप्रधान मोदींना मागे टाकले: तर फडणवीसांनी माफी मागावी वसूली गँगचा पर्दाफाश होत आहे; वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही, असा सवाल करत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महागड्या वस्तू वापरण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकले टाकल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत काल देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केलेल्या वक्तव्याप्रकरणी जाहिर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

नवाब मलिक यांनी त्यांच्या निवासस्थानी आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपानेच महिलांवर टिप्पणी करण्याचा स्तर खाली आणला

काल जयदीप राणा या ड्रग पेडलरबद्दल मी काही तथ्य माध्यमांसमोर ठेवले. मात्र तेव्हापासून एक अपप्रचार सुरु आहे की, मी फडणवीस यांच्या पत्नीला या प्रकरणात खेचत आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत भाजपानेच महिलांचा अवमान केल्याचा आरोप केला. कालच किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या आई आणि बहिणीचा उल्लेख केला. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांची पत्नी, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात चौकशीला बोलावले होते. सोमय्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीचे नाव घेऊन वारंवार आरोप करत असतात. या सर्व महिला नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत महिलांचा अवमान करण्याचा स्तर भाजपाने खाली आणला आम्ही नाही असे पलटवार भाजपावर त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी आता माफी मागावी…

कालच्या माझ्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले. त्यात ते माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडला. मला त्यांना सांगायचे आहे की, देवेंद्रजी तुम्ही तुमचे खास मित्र समीर वानखेडेकडून पंचनामा मागवून घ्यावा. त्यात कुठेही गांजा किंवा आपत्तीजनक वस्तू प्राप्त झाली याचा उल्लेख नाही. ज्यादिवशी जावयाच्या घरी छापा टाकण्यात आला, त्यावेळी मीडियाला खोट्या बातम्या देऊन आम्हाला बदनाम केले गेले. माध्यमांना आज मी तो पंचनामा देत आहे. आता देवेंद्रजींनी माफी मागणार का? असा सवाल त्यांनी केला.

मी जावयाची चार्जशीट कमकुवत करण्यासाठी एनसीबीवर आरोप करतोय, असेही सांगितले गेले. फडणवीस हे स्वतः वकील आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार सहा महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करावी लागते. समीर खान आणि सजनानीच्या केसमध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे. त्यामुळे मी चार्जशीट कमकुवत करत नाही, याही प्रकरणात आपण माफी मागणार का? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला.

तसेच मी राजीनामा दिला होता, यावरही फडणवीस यांनी बोट ठेवले. त्यावर स्पष्टीकरण देताना नवाब मलिक यांनी मी राजीनामा दिल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सावंत कमिशन बसवले गेले. विधानसभेत त्यावर चर्चा झाली. त्यावेळीही मी अशी भूमिका घेतली होती की, जर जनतेसाठी राजीनामा द्यावा लागला तर मी शंभरवेळा राजीनामा देईन माझ्यावर भ्रष्टाचाराचे नाही, तर कोर्टाचे आदेश न मानण्याचे आरोप ठेवले होते. कोर्टाच्या अवमानावर लोकायुक्ताने दखल घेण्याचे अधिकार नसतात. तरीही आम्ही लोकायुक्ताच्या चौकशीला समोर गेलो. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी केलेला हा दावा देखील फोल असल्याचे त्यांनी सांगितले.

काल फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे जाहीर केले त्यांना दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही. माझे अंडरर्वल्डशी संबंध आहेत, असे सांगितले गेले. पण माझे कधीच अंडरर्वल्डशी संबंध आलेले नाहीत. ज्यांचे घर काचेचे आहेत, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत असे फडणवीस म्हणाले होते. त्यांना सांगू इच्छितो माझ्याकडे ना काचेचा महाल आहे ना काचेचे घर… त्यामुळे फडणवीसांना माझा थेट सवाल आहे. तुम्ही गृहमंत्री असताना सरकारवर सर्वाधिक टीका मी केली होती. ज्यादिवशी तुमच्या सरकारला एक वर्ष झाला, तेव्हा तोतया फडणवीस मंत्रालयात फिरत असल्याची टीका मी केली होती. तेव्हा मी तुम्हाला तोतया फडणवीसबद्दल माहितीही दिली होती. तो कुणासोबत उठतो, बसतो त्याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. जर राजकीय डूक धरायचा असता तर मी ही माहिती आपल्याला दिली नसती. त्यावेळी जर मी एका हॉटेलमध्ये झालेल्या भेटीचे फुटेज रिलीज केले असते, तर भाजपचे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नसते. राज्याचा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी होती की, जर कुणी अंडरवर्ल्डशी संबंध ठेवत असेल तर त्यावर कारवाई केली पाहीजे. पण आपण कारवाई केली नव्हती असे का? गृहमंत्री असल्यामुळे आपल्याला मागच्या सरकारच्या काळात सर्व ब्रिफिंग होत होती. तर एका प्रश्नाचे उत्तर द्या, फोर सिझन हॉटेलमध्ये महागड्या पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. एका टेबलचे बुकिंग १५ लाखांपर्यंत असायचे. या महागड्या पार्ट्यांचा आयोजक कोण होता? याची माहिती तुम्हाला नव्हती का? आपले सरकार गेल्यानंतर या पार्ट्या कशा काय बंद झाल्या? तुम्ही या पार्ट्या का रोखल्या नाहीत, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावे लागतील, अशा प्रश्नांच्या फैरीही त्यांनी फडणवीस यांच्यावर झाडल्या.

समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीकडून मोठ्या प्रमाणात वसुली

समीर वानखेडे जेव्हापासून एनसीबी विभागात आला तेव्हापासून वानखेडेने आपली प्रायव्हेट आर्मी बनवली. त्यात किरण गोसावी, मनिष भानुषाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसूजा, इलू पठाण हे त्यात होते. ही प्रायव्हेट आर्मी मुंबईत ड्रग्जचा व्यवसाय देखील करते. नावासाठी केवळ छोट्या – छोट्या लोकांना पकडून कारवाई दाखवली जाते. तसेच वानखेडेच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली गोळा केली गेली. प्रभाकर साईलने सांगितल्याप्रमाणे आर्यन खान प्रकरणात १८ कोटींची वसुली मागितली गेली. सॅम डिसूजा देखील समोर आला असून त्यात त्याने पैसे मागितल्याबद्दल कबुली दिली आहे. मात्र एनसीबीचा यात हात नसल्याचे त्याने म्हटले असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. किरण गोसावी कारवाईच्या ठिकाणी काय करत होता. १३ लोकांचे फोटो सर्व लोकांना आधीच कसे दिले होते? १५ दिवसांपासून प्लॅनिंग कशी चालू होती? हे प्रकरण पुर्ण फर्जीवाडा असून समीर वानखेडेंनी ते रचले होते, असा आरोप करत पहिल्या दिवसापासून मी या प्रकरणातील अनेक बाबी समोर आणल्या. मात्र ‘सत्यमेव जयते’ चा मुखवटा धारण करुन हे लोक प्रकरण दाबत होते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

१५ ऑक्टोबर २०२० रोजी समीर वानखेडेंनी एक केस दाखल केली. याच केसमध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर, दिपिका पदुकोण यांची एनसीबी कार्यालयात परेड केली गेली. आजपर्यंत ही केस बंद झालेली नाही किंवा चार्जशीट दाखल केलेली नाही. याच केसमध्ये हजारो कोटींची वसुली करण्यात आली आहे. मालदीव आणि दुबईमध्ये पैसे घेतले गेले. त्याचेही फोटो मी आधीच दिले आहेत. वानखेडेंनी सहपरिवार मालदिवचा दौरा केला. मालदिवला एवढे दिवस जाणे खर्चिक बाब असते. याची एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमने चौकशी करायला हवी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

वानखेडेंनी महागडे कपडे घालण्यात मोदी साहेबांनाही मागे टाकले

एनसीबीचे ग्यानेश्वर सिंह आणि इतर अधिकारी टीव्हीवर येतात, तेव्हा त्यांचे कपडे आम्ही पाहिले. कुणाचेच हजार पाचशेच्यावर कपडे नाहीत. मग समीर वानखेडेच रोज ५० ते ७० हजारांचे शर्ट कसे काय घालतो? दोन लाखांचा पट्टा, एक लाखांची पँट आणि अडीच लाखांचे बुट घालून ते वावरतात. घड्याळ देखील २० ते ५० लाखांचे घालतात. वानखेडेंच्या या कलेक्शनची किंमतच पाच ते दहा कोटींची असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. वानखेडे सारखा इमानदार व्यक्ती दहा कोटींचे कपडे घालू शकतो का? महागडे कपडे घालण्यात वानखेडेंनी तर मोदींनाही मागे टाकले आहे अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

जर एखाद्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उचलला नाही तर राज्य पोलिसांचे राज्य बनेल. समीर वानखेडे इमानदार आहेत तर त्यांनी आतापर्यंत मोठ्या लोकांना पकडले, त्या प्रकरणात कारवाई का नाही केली? फक्त काही ग्रॅम ड्रग्जवर कशी काय कारवाई केली? हे प्रश्न उपस्थित करत असतानाच नवाब मलिक यांनी जेएनपीटी बंदरावर तीन कंटेनर भरून ५१ टन अफूचे बीज १५ दिवसांपासून पोर्टवर असल्याचे सांगितले. या तीन कटेंनरवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई का नाही केली? मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले, तिथेही कारवाई का नाही केली गेली. ड्रग्जचा व्यवसाय राजकीय पाठबळाशिवाय चालू शकत नाही. ड्रग्जचा विळखा कायमचा नष्ट व्हावा, यासाठी आम्ही देखील सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. पण जर ड्रग्जच्या माध्यमातून जर वसुली गोळा केली जात असेल तर याच्या विरोधात लोकांनी उभे राहिले पाहीजे, असे आवाहनही त्यांनी केली.

याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्या व्हॉट्सअप चॅटचे काही फोटो दाखवले. जास्मिन वानखेडे या सुरुवातीपासून बोलत होत्या की, त्या आपल्या भावाच्या कामात दखल देत नाहीत. पण या चॅटद्वारे असे दिसते की, ड्रग्ज प्रकरणात अडकलेला एक व्यक्ती जास्मिन वानखेडे यांना व्हॉट्सअपवर त्यांचा पत्ता आणि विझिटींग कार्ड मागत आहे. यावरुनच वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी आणि त्यांची बहिण लेडी डॉन वसुलीमध्ये सामील असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

त्यामुळेच वानखेडे महाराष्ट्र पोलिसांच्या अटकेपासून पळत आहेत. म्हणूनच त्यांनी सीबीआयद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तरीही महाराष्ट्र पोलीस याची चौकशी करेलच. माझ्या बोलण्यावर बंधने आणण्यासाठी ते याचिका दाखल करत आहेत. जर त्यांची सत्याची बाजू असेल तर त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे असेही ते म्हणाले.

परमबीर सिंह कसे पळाले? याचे उत्तर केंद्रसरकार आणि भाजपने द्यावे – नवाब मलिक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थित राहिले. त्याआधी त्यांनी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. अनिल देशमुख यांना देखील फसवले गेले आहे. त्यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले, तो व्यक्ती स्वतः फरार आहे आणि आरोप असलेले व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेले तर त्यांना अटक करण्यात आले. ही कारवाई राजकीय सूडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली गेल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

काल भाजपच्या नेत्यांनी ट्विट केले की, पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. अनिल देशमुख यांना अटक केली असली तरी कायदा आपले काम करेल. एक ना एक दिवस सत्य लोकांसमोर येईलच. मात्र परमबीर सिंह कुठे आहेत? याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली.

परमबीर सिंह हे महाराष्ट्रातून चंदीगढ येथे गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. काही लोक सांगतात ते परदेशात गेले आहेत. लुकआऊट नोटीस असतानाही कोणताही व्यक्ती देश सोडून कसा जाऊ शकतो? एकतर हवाई मार्गे किंवा रस्ते मार्गाने जावे लागेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यात भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंह यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे का? याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *