Breaking News

रोहित पवार यांचा सवाल, …तर बुलेट ट्रेनचा आग्रह का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या त्या व्हिडीओचा आधार घेत केला सवाल

मागील काही वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या मुंबई-गुजरात दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनवरून सातत्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच या बुलेट ट्रेनला मुंबईतील स्थानकासाठी लागणारी जागाही महाविकास आघाडी सरकारने दिली नव्हती. आता संपूर्ण स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही सुपर फास्ट ट्रेन महाराष्ट्र ते गुजरात दरम्यान धावणार असून तीचा वेगही बुलेट ट्रेनपेक्षा जास्त असणार असल्याचे स्पष्ट झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत थेट केंद्र आणि राज्य सरकारला तर बुलेट ट्रेनची गरज काय? असा सवाल केला.

महाराष्ट्र-गुजरात दरम्यान ३० सप्टेंबरपासून तिसरी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’धावणार आहे. पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही बुलेट ट्रेनलाही मागे टाकणार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या वेग मापन चाचणीत वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ५३ सेकंदामध्ये १०० किमी प्रतितास वेग गाठला, तर हाच वेग पकडण्यासाठी बुलेट ट्रेनला ५५ सेकंद लागत असल्याचे दिसून आले.

राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलातून सुरुवात होणार असून, ठाणे – शिळफाटादरम्यान २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली.

बुलेट ट्रेनचे वांद्रे – कुर्ला संकुल येथे भूमीगत स्थानक होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार ८००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे. त्यासाठीही निविदा प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली असून येत्या ऑक्टोबरमध्ये निविदा खुली होणार आहे. तसेच, बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात भूसंपादनाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू होती. राज्यात भूसंपादनालाही गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी राज्यातील ४३३.८२ हेक्टर जागा लागणार असून आतापर्यंत ४१४ हेक्टर म्हणजेच ९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. तर नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला ५० टक्के जमिनीचा ताबा मिळाला आहे.

बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या फायद्याची नव्हतीच शिवाय देशाच्या फायद्याची देखील नाही. बुलेट ट्रेनपेक्षा वंदेभारत ट्रेन अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर आत्मनिर्भर भारतात देशी बनावटीच्या कमी खर्चाच्या ट्रेनऐवजी जपानी बनावटीच्या अत्यंत खर्चिक असलेल्या बुलेट ट्रेनसाठी आग्रह का? असा सवालही त्यांनी केला.

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या एक व्हिडीओत वंदे भारत एक्स्प्रेस १८० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावत असताना पाण्याने भरलेल्या ग्लासातील एक थेंबही सांडला नसल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग एका मोबाइल फोनच्या स्क्रीनवरील स्पीडोमीटरवर नोंदला गेला.

Check Also

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात ५४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *