मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे येथील सभेनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते यांच्यातील खडाजंगी चांगलीच गाजते आहे. राज ठाकरे यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर खरमरीत टीका केली आहे. त्याला राष्ट्रवादीकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. पक्षाचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा उल्लेख राजकारणातील जॉनी लिव्हर असा केला.
आव्हाड यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंवर प्रहार केला. ते म्हणाले, राज ठाकरे यांना चार दिवसांत उत्तरसभा का घ्यावी लागली. कारण कार्यकर्ते, समाजात असलेली अस्वस्थता होती. एक नवीन जॉनी लिव्हर राजकीय पटलावर सापडलाय, असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र लवकरच आपल्याला जॉनी लिव्हर म्हणून ओळखेल. जगात हास्यविनोद करणारे हे जगात खूप आहेत. आपणही आहात, असा टोला आव्हाड यांनी लगावला.
आव्हाड म्हणाले, हिडीस फिडीस बोलणं, दुसऱ्याची टिंगल करणे, एवढंच त्यांना जमतं. त्यांना इंधनाचे भाव, भाजीपाल्याचे भाव दिसत नाही. त्यावर काहीच बोलणार नाहीत. मुसलमान दाढी करत नाही, हे कसं बोलला. तुमचाच एक मित्र होता, हाजी अराफत शेख. तो आता भाजपामध्ये आहे. त्याच्या बाजूला बसून जेवला आहात. तो दाढी करत होता, हे विसरलात का? मी फक्त आठवण करून देतोय. तुमच्यासमोरही एक मुसलमान बसला होता, त्याला दाढी होती का? तुम्हाला मुसलमान देशप्रेमी की देशद्रोही हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला. राजकारणात व्यक्तिगत टीका करणं हे पाप आहे. इथे मतभेद होतात, मनभेद होऊ शकत नाहीत. त्यांच्यात जातीयवाद ठासून भरला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
म्हणून फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाषणाची सुरूवात शिवाजी महाराजांच्या नावाने कधी करत नाही. शाहू, फुले, आंबेडकर असं म्हणत असल्याची टीका राज ठाकरे यांनी भाषणात केली होती. त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधून काढली, महात्मा फुलेंनी. केवळ ज्ञानावर आधारीत इतिहासाचं संशोधन करणं, हे त्यावेळचं आश्चर्य होतं. पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज तर त्यांचे वारसदार होते. हे दोघेही माझे आदर्श आहेत, असं म्हणत बाबासाहेबांनी संविधान लिहिले. या तिघांच्या हृदयात शिवाजी महाराज होते. त्यामुळे या तिघांचेही नाव घेणं म्हणजे शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासारखं आहे. पण हे तुम्हाला कळणार नाही, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना लगावला.
शिव्या आम्हीही घालू शकतो, पण आमच्या संस्कृतीत हे बसत नाही. व्यंग हे काढू नये, असं म्हणतात. आपण जे भाषण करता ते आपल्याला लखलाभ असो. संत तुकारामांनी सांगितलं आहे, उत्तर जशास तसं द्यावं. ज्यांच्या पुण्याईवर, वारशावर जिवंत आहात अशा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचं काही राहिले, हे लक्षात घ्या. हे गमावून बसू नका. वारसा जपायचा सोडून खोटंनाटं सांगतात. जेम्स लेनने जे पुस्तक लिहिले ते वाचा. त्यांना माहिती कुणी दिली. तुम्ही ती माहिती का दिली. यावर कधी बोलणार राज ठाकरे. आम्ही तुम्हाला समर्थन देऊ. मुंब्र्यात २००९ नंतर सापडलेल्या दहशतवाद्यांची संख्या काढा. जे सापडले ते मुंब्र्यातील नव्हते. असे तीनच प्रसंग घडले आहेत. नथुराम गोडसे हा देशातील पहिला अतिरेकी होता, त्यावर कधी बोलत नाही, अशी टीकाही केली.
