Breaking News

सुप्रिया सुळे यांचा इशारा, लक्षात ठेवा १०५ मध्ये आमच्यातून गेलेले ५० आहेत… शरद पवार पाऊस कमी झाल्यानंतर शेवटच्या युवकापर्यत जाणार

निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक विधानही खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत काय करायचं असं जेव्हा साहेबांना विचारते. त्यावेळी पवारसाहेब पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत हाही किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.

पैसे देऊन जाणारे आहेत, त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावे असे देशातील लोकांना वाटत आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

नवाबभाई यांनी दिल्लीला अक्षरशः हलवून सोडलं होतं. मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई झाली हा एकप्रकारे अन्याय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दादा यांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे २०२४ मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील म्हणाले,देशात कुठेच भाजपाचा अश्वमेध कुणी रोखला नाही पण…

मागील पाच वर्ष विरोधात काढली त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना आवडले नाही व पहिल्या दिवसापासून आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाला. देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कुणी रोखला नाही मात्र पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार स्थापन केले व कृतीतून दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही हा विश्वास निर्माण केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

आता अडीच वर्षे विरोधी पक्षाची भूमिका चांगल्याप्रकारे बजावली तर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी एकंदरीत राज्यातील जिल्हयांचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

उद्याच्या काळात आपल्याला यश मिळवायचे आहे – अजित पवार

उद्याच्या काळात आपल्याला यश मिळवायचे आहे. आता सरकार नाहीय. महागाई, बेरोजगारी वाढतेय याविरोधात आपल्या महिला आंदोलन करत आहेत. तशाच पध्दतीने त्या – त्या भागातही आंदोलन करायला हवे. केंद्रसरकारने जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी वाढवला आहे. हा फटका गरीब जनतेला बसणार असून या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

नवीन सरकारचे अधिवेशन १८ जुलैला सुरू होणार होते. मात्र १८ जुलैला राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. त्यामुळे ते होईल परंतु सरकार जिथे चुकत असेल तिथे ठोकून विचारु असा स्पष्ट इशाराही त्यांनी सरकारला दिला.

राज्यात कुठल्याही निवडणूका लागल्या की आपण तयार असले पाहिजे. मग त्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूका करा किंवा ताकद असेल तर तिथे एकट्याची ताकद दाखवा. भाजपाचा पराभव करायचा असेल तिथे एकत्र आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागेल – छगन भुजबळ

बाहेर काय पाऊस.. काय वारा पण सगळे आले बघा.. ओकेमध्ये आहे अशी भाषणाची सुरुवात करत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालायात सुनावणी सुरू आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

आडनावावरून नोंदणी करु नका तरी केली गेली. ठाण्यात दहा टक्के ओबीसी दाखवले आहेत. ओबीसी ५४ टक्के आहेत. त्यामुळे जातीय जनगणना करा. निवडणूकीसाठी आपल्याला तयार रहावे लागणार आहे यावरच पुढच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या निवडणूका आहेत असेही त्यांनी सांगितले.

आता आपण विरोधात आहोत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याविरोधात आपण ठामपणे उभे राहायला हवे. ‘गलत का विरोध खुलकर किजीए, राजनीती हो या समाजनीती, इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है तलवे चाटनेवालों का नही’ असाही शायरीतून त्यांनी इरादा स्पष्ट केला. यावेळी राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, निरीक्षकांनी आपली मते, विचार व्यासपीठावर मांडली.

यावेळी  शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण,आमदार प्रकाश सोळंके, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार धर्मारावबाबा आत्राम,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, आदीवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू तोडसाम, उद्योग व कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळूंके, सेवादल सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील आदींसह सर्व निरीक्षक, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *