Breaking News

अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांना दिला दम, सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि संतोष बांगर यांच्या कृत्यावरून दिला दम

काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार सत्तेवर आले. मात्र या सरकारला अद्याप विधीची मान्यता मिळालेली नाही. विश्वासघाताच्या आणि अविश्वासाच्या बळावर हे सरकार उभे राहिले आहे. मात्र या सरकारच्या एका आमदाराकडून हात नाही मोडता आला तर तंगड तोडा असे त्यांच्या समर्थकांना सांगत आहे. तर आणखी एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलला. यावरून तुम्ही कायदा हातात घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून येत असल्याचा सांगत सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला ? अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दम दिला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांच्या वतीने आगामी रणनीती ठरविण्यासाठी आज दुपारी बैठक झाली. त्यानंतर विधिमंडळातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजित अजित पवार हे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

नुकतेच शिंदे गटाचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिवसैनिक जर अंगावर आले तर त्यांना शिंगावर घ्या. त्यांचा हात मोडा हात नाही मोडता आला नाही तर त्यांचे तंगड तोडा अशा प्रक्षोभक भाषेत समर्थकांशी बोलताना सांगितले. यासंदर्भातील एक व्हिडिओ कालच व्हायरल झाला. तर शिंदे गटाचे आणखी एक आमदार संतोष बांगर यांनीही थेट सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओही कालच व्हायरल झाला. या दोन्ही व्हिडिओवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली. या दोन्ही व्हिडिओचा संदर्भ देत अजित पवार यांनी या आमदारांना दम भरला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर आमचा बहिष्कार आहे. आम्ही बहिष्कार का टाकला यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही एक पत्र लिहिले असून त्या पत्रात चहापानावर बहिष्कार टाकण्याची कारणे लिहिण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी अर्धाने करात कपात करण्याची मागणी केली होती. मात्र आज ते सत्तेत आहेत. त्यांनी अवघे दोन आणि तीन टक्क्याने दर कमी केले आहेत. सततच्या पावसामुळे राज्यातील १५ लाख हेक्टर जमिन ओलिताखाली आली आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी आमची मागणी आहे. तसेच या पावसाच्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असताना या सरकारने फक्त एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्याचे जाहिर केले. परंतु एनडीआरएफचे निकष फारच कमी मदतीचे आहेत. आम्ही १५ हजार रूपये मदत दिली होती. यांनी मात्र त्यापेक्षा कमी दिल्याचे सांगत विरोधात असताना वेगळी मागणी करायची आणि सत्तेत आल्यानंतर वेगळे वागायचे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *