Breaking News

अजित पवार म्हणाले, …मंत्रिमंडळ उपसमितीच गुंडाळली

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात राज्यातील एकनाथ शिंदे सरकारकडून दाखविण्यात येत असलेल्या बेफिकीरी, अनास्थेबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेली मंत्रिमंडळाची उपसमिती शिंदे सरकारने बरखास्त केली, त्यानंतर नवीन समिती अद्याप नेमलेली नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ७५ कोटी रुपयांपैकी एक रुपयाही शिंदे सरकारने अद्याप वितरीत केलेला नाही. अशा परिस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा कसा होणार ?, असा प्रश्न उपस्थित करीत मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दलची शिंदे सरकारची ही बेफिकिरी, अनास्था, तमाम स्वातंत्र्यसैनिक आणि मराठवाड्यातील जनतेचा अवमान करणारी, संतापजनक असल्याचा टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा झाला. उद्या १७ सप्टेंबरपासून मराठवाडा-हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने हैदराबाद येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होत असून तेलंगणा सरकारने राज्यपातळीवर भव्य नियोजन केले आहे. मात्र महाराष्ट्रात कुठलीच तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यसरकार मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करण्याबाबत कमालीचे उदासीन, बेफिकीर असल्याचे दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२ – २३ च्या अर्थसंकल्पात मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवासाठी ७५ कोटींची तरतूद केली. महोत्सव साजरा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री सर्वश्री अशोक चव्हाण, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, संदिपान भुमरे, शंकरराव गडाख आणि धनंजय मुंडे या मंत्र्यांची उपसमिती स्थापन केल्याचा शासननिर्णय ४ मे २०२२ रोजी जारी करण्यात आला. त्या समितीने अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाची रुपरेषाही तयार केली. मात्र, राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करण्यात आली. मात्र नवीन समिती स्थापन करण्यात आली नाही. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात तरतुद केलेल्या निधीपैकी एक रुपयाही दिला नाही. मराठवाड्यातून आलेल्या प्रस्तावालाही शिंदे सरकारने प्रतिसाद दिला नाही. शिंदे सरकारची ही बेफिकीरी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील वीरांचा आणि मराठवाड्यातील जनतेच्या भावनांचा अवमान करणारी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर एक वर्षाने १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा व हैदराबादचा भाग निजामाच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाप्रमाणे मराठवाडा व तेलंगणातील जनतेसाठी १७ सप्टेंबर हा दिवसही तितकाच महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची उपसमिती नेमली होती. त्यात मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रस्तावावर अंतिम चर्चाही झाली होती. मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात मराठवाड्यात ज्याठिकाणी ऐतिहासिक घटना घडल्या आहेत, त्याठिकाणी ध्वजस्तंभ उभारावेत. बँक लूट प्रकरणामुळे उमरी, चारठाणा या गावांची इतिहासात नोंद आहे. अशा ५० ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्याचा प्रस्ताव होता. २५ ते ४० लाख रुपये एका स्तंभासाठीचा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावावरही शिंदेसरकारने कोणताच निर्णय घेतलेला नाही. याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *