Breaking News

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने घेतले हे निर्णय भाजप आणि केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे काम होत असून याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.

आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आयकर विभाग, ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचे काम करत आहे. यामुळे या सर्व गोष्टींना खंबीरपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने किंवा भाजपाने कितीही राष्ट्रवादीवर हल्ले केले किंवा केंद्रीय एजन्सींचा वापर केला तरी आमचे नेते किंवा कार्यकर्ता डगमगणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांमध्ये पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय झाला असून याची सुरुवात दसर्‍यानंतर करणार आहे. आगामी तीन – चार महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांची जबाबदारी मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्यावतीने शिबीरे, मेळावे व इतर तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीतील आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर राहणार असून याबाबतची माहिती पालकमंत्री, संपर्कमंत्री आढावा घेऊन पवारसाहेबांकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यात लखीमपूर खिरी प्रकरणात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बंद पुकारला होता. यामध्ये व्यापारी, कामगार संघटना व जनतेने सहभाग नोंदवला त्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने आभार मानण्यात आले.

आगामी सणासुदीमध्ये दुकाने, हॉटेल यांच्यावरील कोरोना काळातील बंधने कमी करावीत, शिथिल करावीत असा निर्णय पक्षाच्यावतीने घेण्यात आला असून हा निर्णय मुख्यमंत्र्यांना भेटून सादर करण्यात येणार आहे. याशिवाय राजकीय परिस्थितीचा व ज्या पोटनिवडणूका झाल्या त्या प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. पूर्वीपेक्षा भाजपाच्या ७ जागा या निवडणुकीत कमी झाल्या असून राष्ट्रवादीच्या जागा वाढल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *