Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग पवारसाहेबांच्या सुरक्षेत वाढ करा - महेश तपासे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्ला करुन राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होता का? पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी करत त्यामुळे पवारसाहेबांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी केली.

शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी मुख्य प्रवक्ते महेश तपासे हे बोलत होते.

आमच्या बलस्थानावर झालेल्या हल्ल्याची राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. हा हल्ला राजकीय प्रेरीत असेल तर आणि राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशारा देत ते पुढे म्हणाले की, पवारांच्या निवासस्थानी जो भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये आरोपींना अटक झाली आहे. परंतु पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करुन राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय हा खरा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.

पवारांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत कसे संबंध आहेत हेही सांगितले आहे. मात्र आज एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत आहे त्यांनीच विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोपही त्यांनी केला.
आपल्यावर कुणी दगड भिरकावला तरी महात्मा गांधी यांच्या शिकवणीप्रमाणे सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते, त्याप्रमाणे आज राज्यभर व गोव्यातही महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या पट्टया बांधून कालच्या घटनेचा निषेध केला आहे. एकंदरीत राज्याचे वातावरण अस्थिर करण्यासाठी केलेला हा हल्ला होता. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे स्वागत केले. पेढे वाटून आनंद व्यक्त केला. न्यायालयाचे स्वागतही केले त्यामुळे ते दगड उचलतील का? असा सवालही त्यांनी केला.
पवारांचा आजचा सातारा दौरा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रद्द केला आहे. मात्र उद्या ते नागपूर दौर्‍यावर जाणार असल्याचे माहितीही त्यांनी दिली.
भाजपाचे अनिल बोंडे हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. जनतेला भडकावणे हे काम अनिल बोंडे सातत्याने करत आले आहेत. कालच त्यांनी या घटनेवर भाष्य केले होते. त्यामुळे कालच्या घटनेची पूर्व कल्पना अनिल बोंडे यांना होती का? हिंसक हल्ल्याला त्यांचा पाठिंबा होता का? हेही तपासले पाहिजे असे सांगत याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात राजकीय क्लेश निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र गृहमंत्रालय यावर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र सुरक्षित रहावा. भडकावू भाषण कोण करत असेल तर असं करुन महाराष्ट्र अस्थिर करु नका अशी हात जोडून विनंती करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात विलिनीकरणाचा कोणताही मुद्दा नव्हता तर एसटीचे आधुनिकीकरण करु असे म्हटले आहे. पडळकरांना मराठी नीट वाचता येत नाही त्यांना मराठीतील जाहीरनामा वाचण्यासाठी पाठवून देऊ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *