खासदार संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केली आहे याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं… नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यावर महेश तपासे यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुखमैदान तोफ संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली अशी बातमी वाचली. काय चाललंय? असा सवाल करत सन २०१९ मध्ये सरकार बनवता न आल्याने भाजपा सुडाचं राजकारण करुन महाविकास आघाडीचे बलशाली नेत्यांना टप्प्याटप्प्याने टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत सातत्याने भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांवर बोलत होते. त्यामुळे त्यांची मालमत्ता व राहतं घर ईडीने जप्त केलं. अशापध्दतीने सुडाचे राजकारण ईडीच्या माध्यमातून भाजपा करत आहे. ईडीच्या अधिकार्यांवर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपानंतर गृहविभागाने एसआयटी स्थापन करुन चौकशी सुरू केली होती आणि आज ईडीने खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली हा योगायोग आहे का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला असल्याचेही ते म्हणाले.
