अभाविपच्या माध्यमातून भाजप आपल्या धर्मनिरपेक्ष शैक्षणिक संस्थांचे सांप्रदायिकीकरण करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा महेश तपासे यांनी तीव्र निषेध केला.
अभाविपचे स्वयंसेवक हे त्यांच्या उजव्या विचारसरणीची विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेचीच धर्मनिरपेक्ष चौकट कमकुवत करण्याचा हा थेट प्रयत्न असल्याचा आरोप करत ते म्हणाले की,
भारतातील विद्यापीठांनी देशाला अभिमान वाटावे असे अनेक उत्कृष्ट नेते, शास्त्रज्ञ, प्रशासक निर्माण केले आहेत. सहकारी विद्यार्थ्यांच्या चालीरीती किंवा खाद्यपदार्थांच्या आवडी निवडीकडे दुर्लक्ष करून ते एकाच कॅम्पसमध्ये राहिले याची आठवणही त्यांनी यानिमित्ताने करून दिली.
त्या काळात प्रत्येकाचा समानतेच्या तत्त्वावर विश्वास होता आणि त्यामुळे कोणीही संपूर्ण समाजावर कोणत्याही विशिष्ट रूढी किंवा धार्मिक सिद्धांताची सक्ती करू शकत नव्हते. मात्र सध्या भाजपाचे स्वयंसेवक शांततापूर्ण व्यवहारात अडथळा आणण्यासाठीच प्रतिक्रिया देत असतात अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपाला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे आणि भारतीय राज्यघटनेची पूर्ण अवहेलना करून देशात हुकूमशाही, बहुसंख्य शासन आणायचे असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.
अभाविपने सुरू केलेल्या हिंसाचाराच्या घटना ही विद्यार्थी समुदायाला घाबरवण्याच्या आणि ध्रुवीकरण करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. विद्यार्थ्यांनी काय खावे, काय परिधान करावे, कसे वागावे हे भाजपाचे कार्यकर्ते कसे ठरवू इच्छितात असा सवाल करत या घटना अत्यंत लाजिरवाण्या असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का? – महेश तपासे
ज्या व्यक्तीला झेड सिक्युरिटी आहे ती व्यक्ती अचानक गायब कशी होते. किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का? गायब व्हायला असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची बदनामी करणारे किरीट सोमय्या आज स्वतः नॉटरिचेबल आहेत हीच मोठी आश्चर्याची बाब आहे. किरीट सोमय्या गायब झाल्यामुळे त्यांनी निश्चितच युद्धनौका ‘विक्रांत’च्या नावाने गोळा केलेले पैशांची अफरातफर केली ही शंका आता जनतेच्या मनात घर करून गेली असेही ते म्हणाले.
